अहिल्यानगर - पाथर्डी गावातील सुखदेवनगरमध्ये कोयताधाऱ्यांनी एका रिक्षाचालकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात २८ वर्षीय रिक्षाचालक संकेत दोंदे हा जखमी झाला असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी संशयित स्वप्निल सोनकांबळे, मयूर तांबे, सोनू सावंत, गौरव आखाडे यांच्याविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास संकेत दोंदे त्याच्या रिक्षातून घरी जात होता. त्याच वेळी संशयित हल्लेखोरांनी कोयत्याने रिक्षाची काच फोडून ती थांबवली. सावंत आणि आखाडे या दोघांनी संकेतला बाहेर ओढले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी सोनकांबळे याने तुझ्यामुळे आमचा नट्या भाई गेला...असे म्हणत कोयत्याने संकेतच्या डोक्यावर वार केला. मात्र सुदैवाने तो वार चुकल्याने संकेतच्या चेहऱ्याला कोयता घासला.
तुझ्या लोकांमुळे नट्या साळवेला जीव गमवावा लागला. आज तू भेटला आहे, तुझा गेम वाजवतो असं म्हणत जोरजोरात आरडाओरड व शिवीगाळ करत संशयित रस्त्यावर कोयता आपटत होते. संकेत दोंदेला जमिनीवर खाली पाडत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्याच्या खिशातील ४ हजार रूपये काढून घेतले. या हल्लेखोरांच्या तावडीतून कसाबसा सुटत संकेत तिथून पळून गेला. त्यानंतर एका घरात जाऊन लपला. तेथून पत्नीला फोन करून बोलावून घेतले त्यानंतर हा प्रकार समोर आला. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दरम्यान, नाशिकमध्ये वाढणाऱ्या गुन्हेगारीनं लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अलीकडेच सिडको येथील उंटवाडी रस्त्यावर धारदार शस्त्र घेऊन वावरणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेने गस्तीवर ताब्यात घेतले. यामध्ये दोघे अल्पवयीन असल्याचं समोर आले आहे. या तिघांकडून अंगझडतीतून एक चॉपर, तलवार, कोयता जप्त केल आहे.