चाकूच्या धाकावर दोघांनी राबोडीतील रहिवाशाला लुबाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 22:24 IST2019-02-13T22:14:47+5:302019-02-13T22:24:34+5:30
रुणवालनगर येथील स्कायवॉकच्या खाली उभ्या असलेल्या रहिवाशाकडील पैसे लुटण्यासाठी चाकूच्या धाकावर ठार मारण्याची धमकी देत दोघांनी लुटमार केल्याची घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली.

राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
ठाणे : आपल्या साथीदाराची वाट पाहत रुणवालनगर येथील स्कायवॉकच्या खाली उभ्या असलेल्या रोशनकुमार सिंग (३७) यांना दोन लुटारूंनी चाकूच्या धाकावर लुटल्याची घटना मंगळवारी पहाटे ५.२५ ते ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोन अनोळखी लुटारूंविरुद्ध राबोडी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राबोडीतील रुस्तमजी अर्बनिया येथील एक्युरा इमारतीमध्ये राहणारे सिंग हे १२ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास रुणवालनगर येथील नाशिक-मुंबई हायवेवरील स्कायवॉकखाली उभे होते. त्यावेळी एका कारमधून आलेल्या दोघांनी चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील मोबाइल आणि पर्सची मागणी केली. पर्स आणि सामान दिले नाही, तर ठार मारू, अशी धमकीही या लुटारूंनी त्यांना दिली. त्यानंतर, त्यांनी सिंग यांच्याजवळील मोबाइल, १२०० रुपये असलेली पर्स आणि बँकेचे एटीएमकार्ड असा एकूण १६ हजार २०० रुपयांचा ऐवज लुबाडून नेला. सिंग यांनी याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून सहायक पोलीस निरीक्षक जाधव अधिक तपास करत आहेत.