नागपुरातील शाळकरी मुलीचे अपहरण करून गुजरातमध्ये विकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 11:23 PM2020-02-11T23:23:37+5:302020-02-11T23:24:46+5:30

आजोबासोबत भांडण झाल्यामुळे रागाच्या भरात घरून निघून गेलेल्या एका शाळकरी मुलीला एका टोळीने फूस लावून गुजरातमध्ये नेले. तिला तेथे दीड लाख रुपयात विकले. ती अल्पवयीन असूनदेखील तिचे लग्न लावून दिले.

Schoolgirl in Nagpur kidnapped and sold her in Gujarat | नागपुरातील शाळकरी मुलीचे अपहरण करून गुजरातमध्ये विकले

नागपुरातील शाळकरी मुलीचे अपहरण करून गुजरातमध्ये विकले

googlenewsNext
ठळक मुद्देअल्पवयीन असूनही लग्न लावून दिले : सात महिन्यात वारंवार अत्याचार : हिंगण्यातील धक्कादायक घटनाक्रम उघड

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आजोबासोबत भांडण झाल्यामुळे रागाच्या भरात घरून निघून गेलेल्या एका शाळकरी मुलीला एका टोळीने फूस लावून गुजरातमध्ये नेले. तिला तेथे दीड लाख रुपयात विकले. ती अल्पवयीन असूनदेखील तिचे लग्न लावून दिले. दरम्यान, सात महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या या मुलीचा शोध लावून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आणि तिच्या तक्रारीवरून नंतर तिची विक्री करणाऱ्यासह पाच जणांना अटक केली. हा धक्कादायक घटनाक्रम हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.
हिंगणा शिवारात राहणारी ही १५ वर्षीय मुलगी १२ जुलै २०१९ ला सकाळी १०.३० च्या सुमारास शाळेत जाते म्हणून घराबाहेर पडली. आजोबासोबत भांडण झाल्यामुळे ती रागाच्या भरात शाळेत न जाता सरळ नागपूर रेल्वेस्थानकावर पोहचली. तेथून ती मुंबईला जाणाºया रेल्वेगाडीत बसली. ती एकटी असल्याचे हेरून रेल्वेत बसलेल्या भाग्यश्री, सीमा आणि कोडी या तिघींनी तिला विश्वासात घेतले. प्रवासादरम्यान खाऊपिऊ घालून तिला आश्वस्त केल्यानंतर तिला नालासोपारा येथे नेले. तेथे सात दिवस ठेवल्यानंतर कोडीने तिला यवतमाळात परत आणले. यवतमाळच्या सातेफळ येथे राहणाºया परमेश्वर कांबळे नामक साथीदाराच्या घरी ठेवले. तेथून परमेश्वर आणि त्याच्या आईने तिला गुजरातमध्ये मनू ठाकोर आणि जयश्री ठाकोर या दाम्पत्याकडे ठेवले. या दोघांनी एका आठवड्यात तीन ते चार परिवाराला तिला दाखवले. त्यातील विशाल पटेल याच्याकडून दीड लाख रुपये घेऊन तिला विकले. आरोपींनी या अल्पवयीन मुलीचे पटेलसोबत लग्नही लावून दिले. त्यानंतर विशाल पटेलने तिला आपल्या घरी पत्नी म्हणून नेले. तिच्यासोबत विशाल सतत शरीरसंबंध जोडत असल्यामुळे तिला गर्भधारणा झाली. मात्र दगदगीमुळे गर्भपातही झाला. दरम्यान, मुलीने मोबाईलवरून आपल्या आईसोबत संपर्क केला अन् हिंगणा पोलिसाना ते कळाले.


तपासाची चक्र गतीमान
परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांना बेपत्ता शाळकरी मुलीबाबत माहिती कळताच त्यांनी तिच्या मोबाईलचा सीडीआर काढून तिला शोधण्याचे आदेश दिले. त्यानुसार, तपासाची चक्र गतीमान झाली. हिंगण्याचे पोलीस पथक गुजरातमधील अहमदाबाद गाठले. मुलीसोबत जयश्री आणि तिचा पती मनू ठाकोर होता. ते नागपूरला येण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. नंतर मेहसाना (गुजरात) येथून मुलीसोबत लग्न करणारा विशाल पटेल, तिची विक्री करणारा परमेश्वर कांबळे आणि हरिदास धनगर (रा. सातेफळ, यवतमाळ) यांनाही ताब्यात घेतले. मुलीला तिच्या पालकांच्या हवाली करण्यात आले.

अनेक प्रकरणाचा छडा लागणार
पोलिसांनी अटक केलेल्या उपरोक्त आरोपींचे काही साथीदार फरार आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणाच्या तपासातून अशाच प्रकारे मुलीची विक्री करून त्यांचे लग्न लावून देणा-या अनेक प्रकरणाचा छडा लागण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे. पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सारिन दुर्गे, द्वितीय निरीक्षक सपना क्षीरसागर यांच्या नेतृत्वात पीएसआय मनोज ओरके, जयदीप पवार, विनोद नरवाडे, मल्हारी डोईफोडे, हवलदार विनोद कांबळे, चामाटे, नायक अभय पुडके, सोमेश्वर वर्धे, ध्रुव पांडे आणि सुजाता रायपुरे यांनी ही कामगिरी बजावली.

Web Title: Schoolgirl in Nagpur kidnapped and sold her in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.