नागपुरात स्कूलबसने विद्यार्थ्याला चिरडले : प्रचंड तणाव, परिसरात तीव्र शोककळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 09:01 PM2020-01-10T21:01:48+5:302020-01-10T21:05:12+5:30

बसमधून विद्यार्थी खाली उतरल्यानंतर तो सुरक्षित अंतरावर गेला की नाही, याची शहानिशा न करताच चालकाने निष्काळजीपणे बस दामटल्याने बसखाली येऊन एक विद्यार्थी चिरडला गेला.

Schoolbus crushes student in Nagpur: huge tension, severe mourning | नागपुरात स्कूलबसने विद्यार्थ्याला चिरडले : प्रचंड तणाव, परिसरात तीव्र शोककळा

नागपुरात स्कूलबसने विद्यार्थ्याला चिरडले : प्रचंड तणाव, परिसरात तीव्र शोककळा

Next
ठळक मुद्देबजेरियात भीषण अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बसमधून विद्यार्थी खाली उतरल्यानंतर तो सुरक्षित अंतरावर गेला की नाही, याची शहानिशा न करताच चालकाने निष्काळजीपणे बस दामटल्याने बसखाली येऊन एक विद्यार्थी चिरडला गेला. यश मेवालालजी मिश्रा असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बजेरिया चौकाजवळ शुक्रवारी दुपारी हा भीषण अपघात घडला. यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.


आठ वर्षांचा यश बजेरियातील तेलीपुऱ्यात राहत होता. मोहननगरातील सेंटर पॉईंट हायस्कूलच्या तिसऱ्या वर्गात यश शिकत होता. नेहमीप्रमाणे आज सकाळी तो शाळेत गेला. दुपारी ३. ३० ते ३. ४५ च्या सुमारास यश त्याच्या स्कूल बसमध्ये (एमएच ४० / बीएल ३६२०) मध्ये बसून घराकडे निघाला. विना वाहकाची ही बस बजेरिया चौकातील एका मेडिकल स्टोर्ससमोर चालकाने थांबवली. यश बसमधून खाली उतरला. तो बसपासून सुरक्षित अंतरावर गेला की नाही, त्याची कोणतीही बसचालकाने शहानिशा न करता आरोपी चालक प्रफुल्ल मथुरे (वय २६, रा. नारा) याने बस पुढे दामटली. त्यामुळे चिमुकला यश बसच्या चाकात आला आणि चिरडला गेला. ते पाहून बाजूची महिला जोरात ओरडली. तिचा आरडाओरड ऐकून परिसरातील मंडळी धावली. चालकाने काही अंतरावर बस उभी केली. त्यानंतर अत्यवस्थ अवस्थेतील यशला मेयोत नेण्यात आले. तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या अपघाताने घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला. माहिती कळताच गणेशपेठ पोलीस तेथे पोहचले. वाहतूक शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित आणि अन्य पोलीस अधिकारीही पोहचले. जमावाकडून बसवर दगडफेक किंवा जाळपोळीचा प्रकार घडू शकतो, हे ध्यानात घेत पोलिसांनी तेथून बस हटविली.

Web Title: Schoolbus crushes student in Nagpur: huge tension, severe mourning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.