मुंबईत शाळकरी मुलीचा विनयभंग, रिक्षाचालकाला अटक
By गौरी टेंबकर | Updated: November 30, 2023 10:26 IST2023-11-30T10:26:08+5:302023-11-30T10:26:40+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुलीने शुक्रवारी संध्याकाळी घरी जाण्यासाठी ऑटोरिक्षा भाड्याने घेतली

मुंबईत शाळकरी मुलीचा विनयभंग, रिक्षाचालकाला अटक
मुंबई: एका १५ वर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दहिसर पोलिसांनी २९ वर्षीय ऑटोरिक्षा चालकाला अटक केली आहे. जेव्हा तिने घरी जाण्यासाठी ऑटो भाड्याने घेतली त्यावेळी हा प्रकार घडला असून याप्रकरणी संजय कुमार साव नामक रिक्षा चालकाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुलीने शुक्रवारी संध्याकाळी घरी जाण्यासाठी ऑटोरिक्षा भाड्याने घेतली. दहिसरला राहणारा आरोपी साव याने दहिसर (पश्चिम) आनंद नगर मेट्रो स्टेशन रोडवरून या मुलीला घेऊन जात असताना रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली. त्यांनतर तिचे चुंबन घेतले, मिठी मारली आणि तिला अयोग्यरित्या स्पर्श केला, असे पोलिसांनी सांगितले. त्यांनतर त्याने तिला तिच्या इच्छितस्थानी सोडले. घडल्या प्रकारामुळे मुलगी घाबरली आणि तिने याबद्दल कोणालाही काहीच सांगितले नाही. मात्र ती सामान्यपणे वागत नाही आणि अस्वस्थ असल्याचे पाहून तिच्या पालकांना काहीतरी चुकल्याचे जाणवले आणि त्यांनी तिला विश्वासात घेत विचारले की काय झाले. त्यानंतर तिने या घटनेबद्दल तिच्या पालकांना सर्व काही सांगितले ज्यांनी नंतर पोलिसांशी संपर्क साधला. दहिसर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला आणि मंगळवारी रात्री सावला त्याच्या घरातून अटक केली. त्याच्यावर पोकसो आणि संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.