नांदेड : भोकर तालुक्यातील चिदगिरी येथे मनरेगा आणि वन विभागाच्या कामावर बोगस मजूर दाखवून त्यांच्या नावाने बोगस खाते उघडून शासनाच्या कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारण्यात आला आहे. २०१२ पासून विनासायास हा प्रकार सुरू आहे. या प्रकरणात गृहमंत्र्यांपर्यंत तक्रारी गेल्यानंतर अखेर भोकर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. असाच काहीसा प्रकार मुखेड तालुक्यातही काही वर्षांपूर्वी झाला होता. चिदगिरी येथे आरोपी रमेश गुलाब चव्हाण आणि मनोज रघुनाथ चव्हाण या दोघांनी हा प्रताप केला आहे. ग्रामस्थांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देतो, असे सांगून त्यांचे आधार कार्ड घेतले. तसेच एका मशीनवर अंगठा घेतला. त्यानंतर राज्यात मुंबई येथे एकमेव शाखा असलेल्या आयडीएफसी बँकेत ग्रामस्थांच्या नकळत खाते उघडण्यात आले. अशा प्रकारे गावातील जवळपास दोन हजार जणांचे खाते या आरोपींनी उघडले असण्याची शक्यता आहे. त्यानंतर स्वत:च या मजुरांच्या नावे सीम कार्ड खरेदी केले. बँकेचे एटीएमही मिळवले. त्यानंतर नावे मनरेगा आणि वन विभागाच्या कामाच्या यादीत टाकण्यात आली होती. असा झाला प्रकरणाचा भांडाफोड साहेब नारायण वाघमारे हे भोसी येथील बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. परंतु, ती बँक बंद असल्याने ते मुदखेड येथे नेट बँकिंगद्वारे पैसे काढण्यासाठी गेले. या वेळी तेथील कर्मचाऱ्याने वाघमारे यांना तुमच्या नावे दोन खाती असून, कोणत्या खात्यातून पैसे काढायचे, अशी विचारणा केली. त्यामुळे वाघमारे हे बुचकळ्यात पडले. त्यांनी आयडीएफसीच्या दुसऱ्या खात्याची माहिती घेतली असता, त्या खात्यावर मनरेगा आणि वन विभागाच्या कामाचे ६५ हजार ११७ रुपयांची नोंद दिसून आली.
बोगस मजूर दाखवून कोट्यवधींवर डल्ला, नांदेडमध्ये २०१२ पासून सुरू होता प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 06:42 IST