खंडणीसाठी वाळू व्यावसायिकाच्या घरात घुसून गोळीबार
By Ajay.patil | Updated: July 28, 2023 00:04 IST2023-07-28T00:03:48+5:302023-07-28T00:04:29+5:30
जळगावातही ‘एक्सटॉर्शन' चे लोण, आधी दगडफेक नंतर फायरींग

खंडणीसाठी वाळू व्यावसायिकाच्या घरात घुसून गोळीबार
अजय पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: वाळू व्यावसायिकाकडून खंडणीची मागणी करत पाच जणांच्या टोळक्याने हैदोस घालत गोळीबार केल्याची घटना गुरुवारी रात्री ८ वाजता वर्दळीच्या आव्हाणे रस्त्यावर असलेल्या के.सी.पार्क येथे घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वरच्या मजल्यावरून खाली बोलविले, न आल्याने केला गोळीबार
या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील आव्हाणे रस्त्यावर के.सी.पार्क जवळ यात शुभम माने हे वाळू व्यावसायिक राहतात. गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोर टोळक्याने धुडगूस घालत त्यांना खंडणी मागितली. त्यांना वरच्या मजल्यावरून खाली बोलावण्यात आले. मात्र ते समोर न आल्याने टोळक्याने खालूनच गोळीबार सुरु केला. यानंतर यातील काही जणांनी वरच्या मजल्यावर येऊन त्यांच्या दरवाजावर दगडफेक करतांनाच पुन्हा गोळीबार केला. अशा प्रकारे या टोळक्याने दोन-तीन फैरी झाडल्या. यानंतर शुभम माने यांना धमकावत या टोळीने तेथून पलायन केले.