Sameer Wankhede : किरण गोसावी म्हणाला, 'मी समीर वानखेडेंना ओळखत नाही पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 19:33 IST2021-10-25T18:47:33+5:302021-10-25T19:33:00+5:30
Kiran Gosavi reaction :त्या नंबरवरून कॉल आल्यानंतर मला विचारणा होत की तू असं का केलं आहेस?, त्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला होता. मी फरार झालेलो नाही.

Sameer Wankhede : किरण गोसावी म्हणाला, 'मी समीर वानखेडेंना ओळखत नाही पण...
क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला २ ऑक्टोबरला अटक करण्यात आली आहे. सध्या तो आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. त्यानंतर अनेक आरोप - प्रत्यारोप सुरु झाले. आर्यन खानसोबत सेल्फी काढणाऱ्या किरण गोसावी यांचा फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. गोसावीविरोधात काही फसवणुकीचे गुन्हे आहेत. त्यात ते एनसीबीच्या कार्यालयात काय करत होते? गोसावी यांनी काढलेला तो सेल्फी चांगलाच व्हायरल झाला होता. रविवारी किरण गोसावी यांचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल याने हा आरोप केला की शाहरुख खानकडे गोसावी यांनी २५ कोटींची मागणी केली होती. या आरोपांचे खंडन करत गोसावी यांनी आता उत्तर देत मी समीर वानखेडेंना ओळखत नाही, टीव्हीवर त्यांना पाहिलं होतं. ड्रग्ज पार्टीबाबत माहिती मिळाली होती म्हणून त्यांना संपर्क साधला असं गोसावी यांनी म्हटलं आहे.
Video : नोकरीसाठी समीर वानखेडेंनी धर्म बदलला, ते मुस्लिमच आहेत; मलिकांनी दाखवला कागद
आपल्यावरील आरोपांचे खंडन करत गोसावी यांनी मुंबई तकशी बोलताना सांगितले की, मी ६ ऑक्टोबरपर्यंत मुंबईत होतो. ३ ते ६ ऑक्टोबर या कालावधीत मला धमकी देणारे अनेक मुंबईतून फोन आले. त्याबाबत मी एनसीबीलाही कल्पना दिली आणि माझ्या वकिलांनाही सांगितलं. असे काही कॉल्स आल्याने मला फोन माझा फोन बंद करावा लागला. ८ ते १० नंबर्सची सखोल माहिती माझ्याकडे आहे. त्या नंबरवरून कॉल आल्यानंतर मला विचारणा होत की तू असं का केलं आहेस?, त्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला होता. मी फरार झालेलो नाही.
मी समीर वानखेडेंना ओळखत नाही. मी त्यांना टीव्हीवर पाहिलं आहे. आम्हाला म्हणजे मला आणि मनिष भानुशाली यांना क्रूझ पार्टीबाबत माहिती मिळाली होती. त्यामुळे आम्ही एनसीबी कार्यालयात गेलो होतो. व्ही. व्ही सिंग सरांना आम्ही भेटलो त्यानंतर आमची भेट समीर वानखेडे यांच्याशी झाली. प्रभाकर साईलबाबत बोलताना गोसावी म्हणाले, प्रभाकरला ओळखतो. ११ ऑक्टोबरपर्यंत तो माझ्याकडे काम करत होता.
तोडपाणीबाबत बोलताना गोसावी यांनी मी पैशांबाबत काही बोलणं केलंच नाही. तो माझ्यावर आरोप करतो आहे त्यात तथ्य नाही. उलट तो मला म्हणत होता तुम्ही मला पंच ठेवल्याबाबत पैसे द्या नाहीतर मी मीडियाला जाऊन त्या सह्यांबाबत सर्व उघड करेन. त्यावर गोसावी त्याला म्हणाले, तुला काय सांगायचे आहे ते सांग. जे काही घडलं त्याप्रकरणी मी कोर्टाची पायरी चढणार आहे.