उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसर हादरला. मिठाई खरेदी करण्यासाठी गेलेला १० वर्षांचा मुलगा दुकानदाराच्या मुलाच्या क्रूरतेचा बळी ठरला. संतप्त आरोपीने मुलाला सायकलवरून फेकून दिलं आणि बेदम लाथा-बुक्कांनी आणि खुर्चीने मारहाणही केली. दुकानात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली. पोलिसांनी आरोपी तरुणाला पकडलं आहे आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहारनपूर जिल्ह्यातील ठाणे नकूर भागातील अंबेहता शहरात ही घटना आहे. एक १० वर्षांचा मुलगा मिठाई खरेदी करण्यासाठी दुकानात गेला होता. त्याने दुकानदाराला म्हणाला की, मिठाई ताजी दिसत नाही. फक्त एवढाच राग दुकानदाराचा मुलगा हिमांशूला झाला. हिमांशूने सर्वात आधी मुलाला त्याच्या सायकलवरून उचललं आणि रस्त्यावर फेकलं.
मुलगा खाली पडताच त्याचं डोकं दुकानाच्या लाकडी काउंटरवर आदळलं, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. पण आरोपी इथेच थांबला नाही. तो सतत मुलाला लाथा मारत होता. एवढंच नाही तर आरोपीने खुर्चीनेही त्याच्यावर हल्लाही केला. या दरम्यान मुलगा वेदनेने ओरडत राहिला, पण आरोपीने ऐकलं नाही. दुकानात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना कैद झाली आहे.
फुटेजमध्ये आरोपी तरुण मुलाला कसं क्रूरपणे उचलून फेकून देत आहे आणि नंतर बेदम मारहाण करत आहे हे स्पष्टपणे दिसून येतं. व्हिडीओ समोर आल्यानंतर परिसरातील लोक संतप्त झाले आहेत आणि आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं. जखमी मुलाला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं. प्रकरण गांभीर्याने घेत पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली.
सध्या मुलावर उपचार सुरू आहेत आणि कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. या घटनेबद्दल स्थानिक लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दोषीला कठोर शिक्षा करण्याचं आश्वासन दिलं आहे. सीओ अशोक कुमार सिसोदिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेडकर शहर परिसरात एका तरुणाने त्याच्या दुकानाबाहेर १० वर्षांच्या मुलाला मारहाण केली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून कारवाई केली जात आहे. आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे.