ठाण्यात कट्ट्याच्या धाकावर लुटमार; सात जणांची टोळी जेरबंद!
By जितेंद्र कालेकर | Updated: December 17, 2024 21:27 IST2024-12-17T21:26:35+5:302024-12-17T21:27:35+5:30
चोरीतील परदेशी चलनासह सुमारे २२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, खंडणी विरोधी पथकाची कामगिरी

ठाण्यात कट्ट्याच्या धाकावर लुटमार; सात जणांची टोळी जेरबंद!
ठाणे : ठाण्यातील नाशिक- मुंबई महामार्गावर एक खासगी प्रवासी कार अडवून 'पुलिस और कस्टम पीछेसे आ रहे, आप गाडी रोको' अशी बतावणी करुन चालकाला गावठी कट्ट्याचा धाक दाखवत सात जणांच्या टोळीने भारतीय आणि परदेशी चलनासह १२ लाख २९ हजारांच्या रोकड असलेल्या दोन बॅगा घेऊन पोबारा केला होता. याच टोळीला अटक केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी मंगळवारी दिली.
आरोपींमध्ये एका महिलेसह अल्पवयीन मुलाचा समावेश असून अटकेतील टोळक्याकडून चोरीला गेलेली रक्कम तसेच गुन्ह्यासाठी वापरलेल्या गाड्या आणि गावठी कट्टा,मोबाईल असा २१ लाख ९७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. उल्हासनगर येथील सुनीता पिल्ले (४५) या ५ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास मुंबई येथे जात होत्या. त्यांच्या गाडीचा एका टोळक्याने पाठलाग करून ठाण्यातील नाशिक मुंबई हायवे मुंबई मार्गावरील कॅडबरी जंक्शनजवळील ब्रीजच्या चढणीवर ते असताना त्यांची कार अडवून त्यांना 'पुलिस और कस्टम पीछेसे आ रहे, अशी बतावणी केली.
चालकाला गाडी बंद करण्याची धमकी देउन या टोळीने पिल्ले यांच्या डाव्या बाजूचा दरवाजा जबरदस्तीने उघडला. प्रतिकार करुनही त्या पिल्ले यांच्या सीटवरील दोन बॅगा टोळक्याने जबरदस्तीने चोरून पळ काढला. त्या बॅगेत परदेशी ५० हजार सौदी रियाल (भारतीय चलनातील ११ लाख २९ हजार ) आणि भारतीय चलनातील एक लाख रूपये असा १२ लाख २९ हजार रूपये घेऊन पोबारा केला होता. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
लुटीबाबत कोणतेही धागेदोरे नसताना सहायक पोलिस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेंद्र पवार, सहायक पोलिस निरीक्षक सुनिल तारमळे, श्रीकृष्ण गोरे, भूषण कापडणीस आणि उपनिरीक्षक विजयकुमार राठोड आदींच्या पथकाने उल्हासनगर मधील मोहीत हिंदुजा (१९) , वरूण होटवानी (२०) , रोहन रेडकर उर्फ बाबू (१९) , स्वप्नील ससाणे उर्फ बाबूराव (२२), अन्वर शेख यांच्यासह कल्याणमधील नीता मनुजा उर्फ भक्ती ( ४०) तसेच एक अल्पवयीन अशा सात जणांना ताब्यात घेतले.
अल्पवयीन वगळता सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून लुटीतील रक्कम तसेच लुटीसाठी वापरलेली कार, दोन मोटारसायकल, गावठी कट्टा, काडतुस आणि मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपींना १९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.