अमरावतीत घरावर दरोडा; लाठ्यांनी मारहाण, पिता-पुत्र जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 12:35 IST2019-10-22T12:35:22+5:302019-10-22T12:35:47+5:30
गाडगेनगर हद्दीतील नागार्जुन कॉलनी येथील अतुल रामदास खवले (३९) यांच्या घरावर अज्ञात चार दरोडेखोर चालून आले

अमरावतीत घरावर दरोडा; लाठ्यांनी मारहाण, पिता-पुत्र जखमी
अमरावती : शहरातील गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सर्वसामान्य व्यक्तीच्या घरावर चौघांनी दरोडा घालून सोन्याचे दागिने लुटले. मात्र, त्यांच्या मारहाणीत पिता-पुत्र गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गाडगेनगर हद्दीतील नागार्जुन कॉलनी येथील अतुल रामदास खवले (३९) यांच्या घरावर अज्ञात चार दरोडेखोर चालून आले. मंगळवारी पहाटे अडीचच्या सुमारास दगडाच्या फाळीने त्यांच्या घराचे दार तोडण्यात आले. समोरच्या खोलीत झोपलेले वडील रामदास गुलाबराव खवले (६२), आई सुमन रामदास खवले (६२), भाचा श्रेयस अनिल ढोरे (१६) यांना घरात शिरलेल्या चौघांनी काठ्यांनी जबर मारहाण केली. आतल्या खोलीत झोपलेले अतुल खवले यांनी बाहेर येताच त्यांनाही मारहाण करण्यात आली. दरोडेखोरांनी सुमन खवले यांच्या कानातील आभूषण व बांगड्या ओढून पळ काढला.
मारहाणीत अतुल व रामदास खवले यांच्या डोक्यावर जबर मार लागला आहे. हेच दरोडेखोर काही अंतरावरील हरिहर कॉलनी येथील राहुल मेहरा यांच्या घरात शिरले. त्यांच्यावर लाठ्यांनी प्रहार करण्यात आला. गच्ची दाबून त्यांना पैशांची मागणी करण्यात आली. मात्र, त्यांनी आपल्याकडे काहीच नसल्याचे सांगितल्यावर त्यांना सोडून त्यांनी बाहेरचा रस्ता धरला. गाडगेनगर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पथक घटनास्थळी दाखल झाले.
चारही दरोडेखोर सडपातळ बांध्याचे असून, चड्डी-बनियान आणि तोंडाला स्कार्फ होता. त्यांच्या अंगाला घाणेरडा वास येत होता, असे प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले.