रियाने जाण्यापूर्वी आठ हार्ड डिस्क केल्या नष्ट; ईडीच्या चौकशीत झाला अनेक बाबींचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 02:49 AM2020-08-28T02:49:57+5:302020-08-28T02:50:13+5:30

सुशांतकडून जया सहाने घेतले १० कोटी; जाहिरातीच्या कमिशनपोटी ही रक्कम मिळाल्याचे दिले स्पष्टीकरण

Rhea destroyed eight hard disks before leaving; The ED's inquiry revealed a number of issues | रियाने जाण्यापूर्वी आठ हार्ड डिस्क केल्या नष्ट; ईडीच्या चौकशीत झाला अनेक बाबींचा खुलासा

रियाने जाण्यापूर्वी आठ हार्ड डिस्क केल्या नष्ट; ईडीच्या चौकशीत झाला अनेक बाबींचा खुलासा

Next

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतकडून टॅलेंट मॅनेजर म्हणून काम केलेल्या जया सहाने दहा कोटी रुपये घेतल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षभरात वेळोवेळी सुशांतच्या बँक खात्यावरून ही रक्कम तिच्या बँक खात्यावर हस्तांतर करण्यात आली. सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी केलेल्या तपासातून ही बाब समोर आली असून जाहिरातीच्या कमिशनपोटी ही रक्कम मिळाल्याचा जबाब तिने अधिकाऱ्यांना दिला आहे.

सुशांत आत्महत्या प्रकरणातील प्रमुख संशयित रिया चक्रवर्तीच्या मोबाइलमधील व्हॉट्सअ‍ॅप चॅटनुसार, जया सहाशी तिचे सुशांतला ड्रग्ज देण्याबाबतचे संभाषण समोर आले आहे. त्याअनुषंगाने ईडीने जयाची सुमारे सहा तासांहून अधिक काळ चौकशी केली. आवश्यकतेनुसार तिला पुन्हा चौकशीला बोलावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जया ही सुशांतकडे वर्षभरापासून टॅलेंट मॅनेजर म्हणून काम पाहत होती. त्याला चित्रपट व जाहिरातीसाठी काम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी तिच्यावर होती. त्यापूर्वी दिशा सालियन हे काम करीत होती. जयाने या कालावधीत सुशांतकडून १० कोटी कमावल्याचे बँक खात्यातील नोंदीवरून स्पष्ट झाले. या कामासाठी कलाकारांना मिळणाऱ्या मानधनाच्या सरासरी ३ ते ५ टक्के रक्कम कमिशन म्हणून घेतली जाते. त्यामुळे सुशांतने गेल्या वर्षभरात किती जाहिराती केल्या, याचा सविस्तर तपशील तिच्याकडून मागविण्यात आला आहे. जरी १० टक्के कमिशन गृहीत धरले तरी त्यासाठी एका वर्षात सुशांतने १०० कोटींच्या जाहिराती केल्या पाहिजेत. मात्र तितकी त्याची मिळकत नव्हती. त्यामुळे जयाने १० कोटी का घेतले, याबाबत चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

रियाने जाण्यापूर्वी आठ हार्ड डिस्क केल्या नष्ट
सीबीआय चौकशीत सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीने रियाने सुशांतचे घर सोडण्यापूर्वी ८ हार्ड डिस्क नष्ट केल्याचे सांगितले. रियाने जाण्यापूर्वी ३ आयटी तज्ज्ञांशी संपर्क साधला. त्यापैकी एक जण घरी आला होता. त्यानेच घरातील ८ हार्ड डिस्क नष्ट केल्या. या वेळी तेथे रिया, सुशांत, दीपेश, नीरज उपस्थित होते, असेही सिद्धार्थने सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. यात रियानेच त्यांना बोलावल्याचा संशय त्यांनी वर्तविल्याचे समजते. हार्ड डिस्कमध्ये सुशांत आणि रियाच्या कुटुंबाच्या परदेश दौऱ्यांसह दोघांच्या कंपन्यांची महत्त्वाची कागदपत्रे होती, असा संशय आहे. मात्र रियाने हे आरोप फेटाळले आहेत.

सुशांत करत होता चरसचे सेवन
सुशांतचा बॉडीगार्ड मुश्ताक शेखने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीत, सुशांत चरसचे सेवन करत असल्याचे सांगितले आहे. शेख हा २०१८ ते २०१९ दरम्यान सुशांतचा बॉडीगार्ड होता. त्या वेळेस अनेकदा सुशांत चरसचे सेवन करत असे. याच काळात रिया सुशांतच्या आयुष्यात आली होती. नेहमीच वाहनात चरस नसेल याची खबरदारीही तो घेत होता, जेणेकरून तो पोलीस तपासात अडकू नये, असे या बॉडीगार्डने सांगितले.

रिया म्हणते, जीवाला धोका!
रियाने सोशल मीडियावर घराजवळ जमलेल्या गर्दीचा व्हिडीओ शेअर केला आहे. आम्ही तपास यंत्रणांना सहकार्य करण्यासाठी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. मात्र आमच्या जीवाला धोका असून मुंबई पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केल्याचे नमूद केले आहे.

रियाच्या मते, सुशांतला वाटायची विमानात बसायची भीती, सुशांत प्लेन उडवितानाचा व्हिडीओ अंकिताने केला व्हायरल
सुशांतप्रकरणी पहिल्यांदाच माध्यमांसमोर आलेल्या रियाने आपल्या युरोप सहलीबाबत सांगताना, सुशांतला क्लॉस्ट्रोफोबिया असल्याने विमानात बसण्याची भीती वाटत होती. त्यावर तो औषधे घेत असल्याचे सांगितले. मात्र त्यावर सुशांतची मैत्रीण अंकिता लोखंडे हिने सुशांत प्लेन उडवितानाचा व्हिडीओ शेअर करून रियाचा दावा खोडून काढला. रियाने दिलेल्या माहितीत सुशांत विमान प्रवासापूर्वी मोडाफिनिल
नावाचे औषध घ्यायचा, असे म्हटले आहे. तर अंकिताने शेअर केलेल्या व्हिडीओत, ‘हा क्लॉस्ट्रोफोबिया आहे का? तुला नेहमी उंच उडायचे होते आणि तू ते केलस सुद्धा’ असे म्हटले आहे.

रिया-सुशांतमध्ये झाले होते कडाक्याचे भांडण
रियाने ८ जूनला सुशांतचे घर सोडले, त्या वेळी दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. त्याची रूम आतून लॉक असल्याने केवळ आरडाओरड ऐकू येत होती. रिया घरातून बाहेर जाताना तिचे डोळे सुजले होते, असा जबाब नोकर नीरज सिंहने दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Rhea destroyed eight hard disks before leaving; The ED's inquiry revealed a number of issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.