नारनौल - हरियाणाच्या महेंद्रगड जिल्ह्यातील मुलोदी गावात खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत लष्करातील निवृत्त कॅप्टन राम सिंह यांची लाठी काठीने हल्ला करून हत्या करण्यात आली आहे. हा हल्ला गावातील सरपंच प्रवीण आणि त्याच्या ३ साथीदारांनी मिळून केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर गावात दहशतीचं वातावरण पसरले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, निवृत्त कॅप्टन राम सिंह यांच्या घरी रात्री उशिरा बोलेरो गाडीतून काही लोक आले होते. त्यातील एका व्यक्ती भिंत ओलांडून घरात घुसला आणि मुख्य दरवाजा उघडला. त्यानंतर सर्व आरोपी घरात घुसले आणि लाठीकाठीने राम सिंह यांच्यावर हल्ला केला. ज्यात राम सिंह यांचा जागीच मृत्यू झाला.
राजकीय वादातून हत्येचा संशय
मृत राम सिंह यांचा मुलगा रामलाल यांनी या प्रकरणी धक्कादायक आरोप केला आहे. रामलाल हरियाणा पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. त्याने सांगितले की, गावातील सरपंचाने जुन्या राजकीय वादातून हत्येचा कट रचला. विधानसभा निवडणुकीवेळी राम सिंह यांच्या कुटुंबाने सरपंच यांना मतदान देणार नाही अशी भूमिका घेतली. त्यातून नाराज होऊन सरपंचाने याआधी धमकी दिली होती. आम्ही निवडणुकीत आरोपीला मतदान केले नाही त्याचा बदला घेण्यासाठी त्याने आमच्यावर सूड उगवला.
घटनेचा व्हिडिओ बनवला, पुरावेही सापडले
राम सिंह यांच्यावरील हल्ल्यात जीव वाचवण्यासाठी लपून बसलेल्या सूनेने ही घटना मोबाईलमध्ये कैद केली. हा व्हिडिओ पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. राम सिंह यांना मारहाण करून आरोपी तिथून पसार झाले. त्यावेळी एका आरोपीच्या खिशातून सरपंचाचे आधार कार्ड आणि एक नोट सापडली. त्यावर फोन नंबर लिहिला होता. पोलिसांनी हे पुरावे जप्त केले आहेत. राम सिंह यांचा मुलगा रामलाल याच्या तक्रारीवरून ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींवर हत्येची कलमे लावली आहेत. आरोपी फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, या घटनेनंतर गावात दहशत माजली आहे. एका लोकप्रतिनिधीवर गावची सुरक्षा आणि लोकांचं हित करण्याची जबाबदारी असते त्याने अशाप्रकारे निवृत्त लष्करी अधिकाऱ्याची हत्या केली. या घटनेनंतर पोलिसांनी गावात शांतता ठेवण्याचं आवाहन केले आहे. दोषींना लवकरच पकडू असंही आश्वासन पोलिसांनी ग्रामस्थांना दिले आहे.