भिवंडी - ब्युटी पार्लरचा व्यवसाय करणाऱ्या लक्ष्मीबाई भुरला ( वय ३८ ) या विधवा महिलेची तिच्या राहत्या घराच हत्या केल्याची घटना मागच्या आठवड्यात हाफसनआळी परिसरात असलेल्या एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर घडली होती. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर पोलिसांनी तांत्रिक व मोबाईल लोकेशनच्या आधारे हत्येचा उलगडा केला असून या हत्येप्रकरणी मृत महिलेच्या विवाहित प्रियकराला भिवंडी शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. प्रकाश पाटील (वय ५९ , रा. खारबाव ) असे अटक केलेल्या प्रियकराचे नाव आहे.
आरोपी प्रकाश पाटील हे भिवंडीतील एका बँकेत अकाउंटंट म्हणून तीन वर्षांपूर्वी कार्यरत असताना मृत लक्ष्मीबाईशी त्याची ओळख झाली होती . त्यांनतर काही दिवसात या दोघांमध्ये अनैतिक संबध निर्माण झाले होते. तर दुसरीकडे आरोपी प्रकाश सेवानिवृत्त झाल्याने त्याच्याकडे मृत विधवा ब्लॅकमेल करून आपले अनैतिक संबंधाची माहिती तुझ्या घरच्याना देईल अशी धमकी देऊन त्याच्याकडे घर घेण्यासाठी ९ लाख रुपयांसाठी तगादा लावला होता. यामुळे आरोपीला राग येऊन त्याने तिची ५ दिवसापूर्वी घरात कोणी नसताना लक्ष्मीबाई यांच्या शरीरावर धारधार शस्त्राने ९ ते १० वार करत गळा चिरून त्यांची निर्घृण हत्या केली होती. विशेष म्हणजे घटनेच्या दिवशी घराचा दरवाजा आतून उघडण्यात आला असल्याने व घरातील वस्तूंची चोरी झाली नसल्याने हि हत्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीने केली असल्याचा प्राथमिक अंदाज त्यावेळी पोलिसांकडून व्यक्त केला होता. पोलिसांनी याच दिशेने तपास करीत प्रकाश पाटील याला खारेगाव मधून ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे अधिक चौकशी पोलिसांनी केली असता त्याने हत्येची कबुली दिल्याची माहिती शहर पोलीसांनी दिली आहे. आरोपीकडून गुन्ह्यात वापरेला धारदार चाकू आणि मोटरसायक हस्तगत करण्यात आली असून गुरुवारी आरोपीस न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती भिवंडीचे पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली आहे.