मुंबई - लोढा डेव्हलपर्सच्या (पूर्वीचे मॅक्रोटेक डेव्हलपर्स) संचालक मंडळातील माजी संचालक राजेंद्र लोढा यांच्या पोलिस कोठडीत २९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयाने वाढ केली. त्यांना १७ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना २३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.
राजेंद्र लोढा यांच्यावर रिअल इस्टेट प्रकल्पासाठी जमीन संपादन करण्याची जबाबदारी होती. राजेंद्र लोढा यांनी ऑगस्टमध्ये लोढा डेव्हलपर्सच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. राजेंद्र लोढा यांचे वर्तन आणि ऑफिसमधील वेळ याची चौकशी कंपनीच्या नैतिकता समितीकडून करण्यात येत असल्याचे कंपनीने सांगितले. त्यानंतर १५ सप्टेंबर रोजी कंपनीने राजेंद्र लोढा त्यांचा मुलगा साहिल यांच्यासह दहाजणांवर गुन्हा दाखल केला. बनावटगिरी, गुन्हेगारी कट आणि गुन्हेगारी विश्वासघात व अन्य भारतीय न्याय दंड संहितेच्या अन्य कलमांतर्गत लोढा व अन्य नऊजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
एस्प्लेनेड दंडाधिकारी न्यायालयात राजेंद्र लोढा यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी करताना पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, बेनामी कंपन्यांबाबत राजेंद्र लोढा यांच्याकडून आणखी माहिती घ्यायची आहे. तसेच राजेंद्र यांनी त्यांचा मुलगा साहिल याला पाठविलेल्या ४९ कोटी रुपयांचे फॉरेन्सिक ऑडिट करायचे आहे. तसेच त्याच्या सहकाऱ्यांकडे असलेल्या सोन्याच्या बारचा शोध घ्यायचा आहे. त्यासाठी त्याची कोठडी आवश्यक आहे.
रोख रक्कम जमा करून राजेंद्रकडे द्यायचा चालकयाप्रकरणी राजेंद्र यांच्या ड्रायव्हरचा जबाब नोंदविण्यात आला आहे. वेगवेगळया ठिकाणाहून रोख रक्कम जमा करून राजेंद्र यांच्याकडे देत असल्याचे ड्रायव्हरने सांगितले आहे. तक्रारीनुसार, लोढा व अन्य नऊजणांनी बोगस जमीन व्यवहार केला. त्यासाठी बेनामी कंपन्यांचा वापर केला. कंपनीच्या काही मालमत्ता आणि हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) बाजारभावापेक्षा कमी भावाने विकले. तसेच लोढा डेव्हलपर्सच्या मालकीची जमीन कमी दराने विकून ती बाजारभावाने पुन्हा खरेदी केली. त्यासाठी त्यांनी ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’चा गैरवापर केला.