Dausa Prince Case: एखाद्या सस्पेन्स चित्रपटाच्या कथानकालाही मागे टाकेल अशी एक भयानक घटना राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातून समोर आली आहे. ६ वर्षांपूर्वी संशयास्पदरित्या बेपत्ता झालेल्या ४ वर्षांच्या प्रिंस उर्फ टिल्लू बैरवा या चिमुरड्याची हत्या झाल्याचे आता पोलीस तपासात स्पष्ट झाले. या प्रकरणातील धक्कादायक प्रकार म्हणजे, आरोपींनी हत्या करून ज्या जमिनीत मृतदेह गाडला होता, त्यावर आता दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे उभा राहिला आहे.
ऊनबडा गावातील प्रिंस बैरवा ६ वर्षांपूर्वी अचानक बेपत्ता झाला होता. त्यावेळी पालकांनी तो हरवल्याची तक्रार दिली होती. अनेक वर्षे उलटूनही शोध लागला नाही, तेव्हा वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टाच्या कडक भूमिकेनंतर या प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू करण्यात आला आणि पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या संशयितांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी संशयावरून कृष्णा आणि अनिल या दोन भावांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली. सुरुवातीला भावाने गुन्हा कबूल केला, मात्र नंतर या प्रकरणाची मुख्य सूत्रधार त्यांची बहीण असल्याचे समोर आले. आरोपी बहिणीने कोणताही पश्चात्ताप न व्यक्त करता सांगितले की, "माझा भाऊ कमकुवत मनाचा आहे, पण मीच त्या मुलाला संपवले." जुन्या वादातून आणि वैयक्तिक रागातून या निष्पाप चिमुरड्याचा बळी देण्यात आला.
तपासासाठी दिल्लीहून मागवले विशेष रडार
ज्या ठिकाणी मृतदेह गाडल्याचे आरोपी सांगत आहेत, त्या ठिकाणचा नकाशा आता पूर्णपणे बदलला आहे. तिथे आता मोठा एक्सप्रेसवे बांधला गेला आहे. मृतदेहाचे अवशेष शोधण्यासाठी पोलिसांनी आता हाय-तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. दिल्लीहून विशेष ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार मशीन मागवण्यात आली आहे. या मशीनने जमिनीच्या ९ मीटर खाली काही संशयास्पद संकेत दिले आहेत. त्यामुळे गेल्या ३ दिवसांपासून दोन जेसीबीच्या साहाय्याने सुमारे १५ फुटांपर्यंत खोदकाम पूर्ण झाले असून आता रडारच्या खुणेनुसार अचूक ठिकाणी पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दुबईहून धावत आले प्रिन्सचे वडील
प्रिन्सचे वडील जगमोहन बैरवा हे पोटापाण्यासाठी दुबईला गेले होते. आपल्या मुलाच्या हत्येचा उलगडा झाल्याची आणि पोलीस खोदकाम करत असल्याची माहिती मिळताच २१ फेब्रुवारीला ते तातडीने भारतात परतले. "माझा मुलगा ज्या स्थितीत असेल, त्या स्थितीत मला तो हवा आहे. मला न्याय मिळावा," असे त्यांनी सांगितले. मुलाला शोधण्यासाठी या कुटुंबाने आतापर्यंत १० लाख रुपयांहून अधिक खर्च केला आहे.
पोलिसांसमोर मोठे आव्हान
दौसाचे पोलीस अधीक्षक सागर राणा स्वतः या मोहिमेवर लक्ष ठेवून आहेत. ६ वर्षांचा काळ लोटल्यामुळे मृतदेहाचे केवळ सांगाडे किंवा अवशेष मिळण्याची शक्यता आहे. हायकोर्टाच्या देखरेखीखाली सुरू असलेल्या या तपासामुळे संपूर्ण राजस्थानमध्ये खळबळ उडाली आहे.
Web Summary : Six years after a boy disappeared in Dausa, Rajasthan, police discovered he was murdered. The body was buried where the Delhi-Mumbai Expressway now stands. A neighbor confessed to the crime, driven by personal anger. His father, working in Dubai, returned home seeking justice.
Web Summary : दौसा, राजस्थान में छह साल पहले लापता हुए एक लड़के की हत्या का खुलासा हुआ। दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे के नीचे शव दफनाया गया था। एक पड़ोसी ने व्यक्तिगत गुस्से में अपराध कबूल किया। दुबई में काम कर रहे पिता न्याय की तलाश में घर लौटे।