अमृतसरच्या अजनाला येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा बदला घेण्यासाठी स्वतःच्या मुलाला किडनॅप आणि छळ केला आहे. पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, चार महिन्यांपूर्वी पतीने घरातूनच आपल्या लहान मुलाला किडनॅप केलं आणि आता तो त्याला मारहाण करतो. एवढंच नाही तर त्याला ड्रग्ज देऊन त्याचे व्हिडीओ पाठवत आहे.
ज्योती असं या महिलेचं नाव आहे, तिने आरोप केला आहे की, पती मुलाला सोडण्यासाठी ४ लाख रुपये मागत आहे. तो मुलाला मारण्याची आणि पैसे न दिल्यास मुलाला मारून नातेवाईकाच्या दारासमोर फेकून देण्याची धमकी देतो. तिने चार महिन्यांपूर्वी पोलिसांत तक्रार दाखल केली होती, परंतु कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योतीने तक्रार केली आहे आणि ते या प्रकरणात कारवाई करत आहेत. तपास अधिकारी बलजीत सिंह यांनी सांगितलं की, आरोपी ज्या मोबाईल नंबरवरून कॉल करत होता तो आता बंद आहे, त्यामुळे लोकेशन शोधणं कठीण झालं आहे. लवकरच आरोपीला अटक केली जाईल आणि कायदेशीर कारवाई केली जाईल.
या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. आई आणि आजोबा आपल्या मुलाच्या सुरक्षिततेसाठी खूप प्रयत्न करत आहेत, आरोपी वडिलांच्या क्रूरतेने आणि मद्यधुंद अवस्थेतील व्हिडिओने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. महिलेला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि मुलाचं जीवन सुरक्षित राहावे यासाठी ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.