दिल्लीतील पुनीत खुराना आत्महत्या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. पोलीस अधिक तपास करत आहेत. पुनीत खुराना आणि त्याची पत्नी मनिका पाहवा यांच्यातील संभाषणाचं कॉल रेकॉर्डिंगही समोर आलं आहे. पुनीतच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार दोघेही लग्नापूर्वी एकमेकांना ओळखत होते. पुनीत आणि मनिका यांचं २०१६ मध्ये लग्न झालं होतं. पण लग्नाच्या दीड वर्षानंतर त्यांचं नातं बिघडू लागलं आणि दोन वर्षांनी घटस्फोट घेण्याची वेळ आली.
याच दरम्यान, समोर आलेल्या या दोघांच्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये पुनीतने म्हटलं आहे की, "या गोष्टींना आता काही अर्थ राहिलेला नाही, माझं कोणाशीही अफेअर नाही. आता मला सांग तुला काय हवं आहे." म्हणजेच पुनीत आणि मनिका यांच्यातील संबंध बिघडवण्यात तिसऱ्या व्यक्तीचा देखील समावेश होता, असं म्हटलं जात आहे. दिल्लीपोलिसांनी मनिका आपल्या माहेरी राहत असल्याचं सांगितलं.
पुनीत आत्महत्येप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. मनिकाचीही सतत चौकशी केली जात आहे. लग्नाच्या अवघ्या दीड वर्षानंतर दोघांचं नातं बिघडल्याचे तपासात समोर आलं आहे. पुनीत आणि मनिका यांच्यातील संभाषणात पुनीत म्हणाला की, माझं कोणाशीही अफेअर नाही. तर दुसरीकडे मनिकाही मी मागे जात आहे, तुझं सत्य कळल्यावर तू या लायकीचा नाहीस असं म्हणताना दिसत आहे. दिल्ली पोलीस याचा तपास करत आहेत.
पुनीत ज्या घरात राहत होता ते घर मनिकाच्या नावावर असल्याचंही समोर आलं आहे. पुनीतने त्याच घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पुनीतचे कुटुंबीय घराबद्दल काहीच बोलत नाहीत. त्याचवेळी पुनीतच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, आत्महत्येपूर्वी पुनीतने सुमारे ५९ मिनिटांचा व्हिडीओ बनवला होता, जो त्याच्या मोबाईलमध्ये आहे. हा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
पुनीत हा दिल्लीच्या प्रसिद्ध वुडबॉक्स कॅफेचा को-ओनर होता. त्याची पत्नी मनिकाही या व्यवसायात पार्टनर होती. ३१ डिसेंबर रोजी रात्री पुनीतने मॉडेल टाऊन पोलीस ठाणे येथील कल्याण विहार परिसरात असलेल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी पुनीतचं पत्नी मनिका हिच्याशी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास फोनवर बोलणं झालं होतं. दोघांमधील संभाषणाचे कॉल रेकॉर्डिंगही समोर आलं आहे. पुनीत आणि मनिका यांच्यात घटस्फोटाचा खटला सुरू होता.