Pune pooja chavan death case; Don't give unnecessary publicity | पुण्यातील तरुणी मृत्यू प्रकरण; अनावश्यक प्रसिद्धी देऊ नका

पुण्यातील तरुणी मृत्यू प्रकरण; अनावश्यक प्रसिद्धी देऊ नका

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पुण्यातील तरुणीचे बहुचर्चित आत्महत्या प्रकरण व तिच्या कथित अनैतिक संबंधांना अनावश्यक प्रसिद्धी देऊ नये, असे निर्देश उच्च न्यायालयाने शुक्रवारी प्रसारमाध्यमांना दिले.


तरुणीच्या आत्महत्येबाबत व तिच्या प्रेमसंबंधांबाबत प्रसारमाध्यमांत वृत्त येत असल्याने तिच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणी न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठापुढे होती. तरुणीच्या वडिलांच्या वतीने ज्येष्ठ वकील शिरीष गुप्ते यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.
पुण्याच्या घरातील बाल्कनीत उभी असलेली तरुणी पाय 
घसरून खाली पडली. यात तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर लगेच  प्रसारमाध्यमांनी २३ वर्षीय तरुणीचे एका राजकीय व्यक्तीबरोबर अनैतिक संबंध असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले. हे वृत्त बदनामीकारक आहे. तसेच तरुणीचे अज्ञात व्यक्तीबरोबर झालेले संभाषण राजकीय व्यक्तींनी व प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले, अशी माहिती गुप्ते यांनी उच्च न्यायालयाला दिली.


गुप्ते यांनी दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात उच्च न्यायालयाने प्रसारमाध्यमांनी कसे वार्तांकन करावे, याबाबत आखलेली मार्गदर्शक तत्त्वे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली. सकृतदर्शनी याचिकाकर्त्यांच्या आरोपात तथ्य आहे, असे म्हणत न्यायालयाने सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे निर्देश प्रसारमाध्यमांना दिले.


४ वृत्तवाहिन्यांना नोटीस 
याचिकाकर्त्यांच्या मुलीच्या मृत्यूसंबंधी व तिच्या कथित प्रेमसंबंधाला अनावश्यक प्रसिद्धी देऊ नये, असे म्हणत सुनावणी 
३१ मार्च रोजी ठेवली. न्यायालयाने या प्रकरणी केंद्र व राज्य सरकार, 
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया, न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशन व चार मराठी वृत्तवाहिन्यांना नोटीस बजावली आहे.

Web Title: Pune pooja chavan death case; Don't give unnecessary publicity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.