तलवारीच्या धाकाने लुटणारे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 01:07 IST2018-11-05T01:07:07+5:302018-11-05T01:07:19+5:30
इंदापूर-अकलूज राज्यमार्गावर पहाटे टेम्पोचालकाला अडवत तलवारीचा धाक दाखवून त्याच्याकडून ५२ हजारांची रोकड लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात बारामतीच्या विशेष गुन्हे शोध पथकास यश आले आहे.

तलवारीच्या धाकाने लुटणारे अटकेत
बारामती - इंदापूर-अकलूज राज्यमार्गावर पहाटे टेम्पोचालकाला अडवत तलवारीचा धाक दाखवून त्याच्याकडून ५२ हजारांची रोकड लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात बारामतीच्या विशेष गुन्हे शोध पथकास यश आले आहे. पाच जणांच्या या टोळीतील तिघे पोलिसांनी जेरबंद केले आहे. या पाच जणांवर विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : नितीन ऊर्फ काळ्या बाळू ऊर्फ भारत चव्हाण (रा. शेटफळ, हवेली, ता. इंदापूर), सचिन उत्तम महाजन (रा. सुरवड, ता. इंदापूर), दिनेश क्षीरसागर ऊर्फ डी. के. (रा. शेटफळ हवेली, ता. इंदापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सोमनाथ ऊर्फ लाला राऊत, धनाजी ऊर्फ एमड्या मोरे (रा. शेटफळ हवेली) दोघे फरार आहेत. या पाच जणांवर यापूर्वी विविध पोलीस ठाण्यात दरोड्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
दि. १८ जून रोजी फिर्यादी अबुबकर उमर शेख (रा. नाना पेठ, पुणे) इंदापूर-अकलूज मार्गाने टेम्पो घेऊन जात होते. यावेळी अज्ञात पाच अनोळखी व्यक्तींनी दुचाकीवर येऊन टेंपोला दुचाकी आडवी लावून टेंपोचालक शेख यांच्या गळ्याला तलवार लावून त्यांच्या खिशातील ५२ हजारांची रोकड व टेंपोची चावी हिसकावली होती. याबाबत शेख यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल केला होता.
बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार : काळ्या चव्हाण याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केला आहे. तो उसाची गाडी नीरा भीमा कारखान्यावर खाली करण्यासाठी घेऊन येणार असल्याचे समजले.
त्यानुसार बारामतीच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून अन्य आरोपींना बेड्या ठोकल्या.
ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस हवालदार शिवाजी निकम, संजय जगदाळे, संदीप मोकाशी, सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, संदीप कारंडे, अभिजित एकशिंगे, स्वप्निल अहिवळे, रॉकी देवकाते, शर्मा पवार, विशाल जावळे, दशरथ कोळेकर, सदाशिव बंडगर यांनी केली.