पाटणा येथील अगमकुआं पोलीस स्टेशन परिसरात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. दिल्लीतील रहिवासी विकास कुमारने बुधवारी PUBG गेम खेळण्यापासून रोखल्यानंतर भाड्याने राहत असलेल्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला, शवविच्छेदनासाठी पाठवला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
विकासची पत्नी मनिता कुमारीने दिलेल्या माहितीनुसार, पती नेहमी PUBG गेम खेळायचा आणि गेमद्वारे पैसे कमवून घर चालवायचा. जेव्हा जेव्हा त्याला गेम खेळण्यापासून रोखलं जायचं तेव्हा तो आत्महत्या करण्याची धमकी द्यायचा. ज्यावेळी त्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं तेव्हा मनिता तिच्या मावशीच्या घरी गेली होती.
सकाळी ५ वाजता मनिताचं तिच्या पतीशी फोनवर शेवटचं बोलणं झालं होतं. याच दरम्यान तिने त्याला पुन्हा गेम खेळण्यास मनाई केली होती. काही वेळाने घरमालकाने फोन करून विकासने आत्महत्या केल्याचं कळवलं. मनिताची मावशी शकीला देवी म्हणाल्या की, विकास PUBG गेमवर पैस लावून कमाई करायचा आणि घरचा खर्च यातून भागवला जात असे. तो दिवसरात्र मोबाईलवर गेम खेळायचा म्हणून मनिता त्याला खेळण्यापासून रोखायची.
अगमकुआं पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक रामायण सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. कुटुंबातील सदस्यांनी सांगितलं की, त्याला गेम खेळण्याचं व्यसन होतं आणि त्यामुळे पती-पत्नीमध्ये वाद होत होते. सध्या पोलीस सर्व बाबींचा तपास करत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.