बंगळुरूमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका कॉलेजमधील दोन प्राध्यापक आणि एका सहकाऱ्याविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील ही घटना आहे. ओडिशाच्या बालासोरमध्ये एका विद्यार्थिनीने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बंगळुरुमध्ये ही घटना उघडकीस आली. ओडिशामध्ये महाविद्यालयातील एक प्राध्यापक तिचा लैंगिक छळ करत असल्याचा आरोप तिने केला होता.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरोपी हा येथील मुडबिद्री येथे प्राध्यापक म्हणून काम करतो तर विद्यार्थिनीही त्याच महाविद्यालयात शिकते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राध्यापकाने शैक्षणिक नोट्स शेअर करण्याच्या बहाण्याने तिच्याशी मैत्री केली आणि तिच्याशी वारंवार गप्पा मारू लागला. नंतर, प्राध्यापकाने शैक्षणिक कारणांमुळे विद्यार्थिनीला बंगळुरूला बोलावले आणि त्याच्या मित्राच्या घरी लैंगिक अत्याचार केले.
आरोपीने कथितरित्या दुसऱ्या प्राध्यापकालाही या कृत्याबद्दल सांगितले, त्यानंतर दुसऱ्या प्राध्यापकाने फोटो आणि व्हिडीओ वापरून विद्यार्थ्यीनीला त्याच्यासोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनीने तिच्या तक्रारीत आरोप केला आहे की, प्राध्यापकाच्या सहकाऱ्यानेही तिच्यावर बलात्कार केला होता, त्याने सुरुवातीच्या बलात्काराचा व्हिडीओ वापरून तिला ब्लॅकमेल केले होते, असा आरोप तिने केला आहे.
ओडिशात विद्यार्थिनीचा मृत्यू
बालासोरमधील फकीर मोहन महाविद्यालयातील बी.एड.च्या दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थिनीने (२०) शिक्षण विभागाच्या प्रमुख समीरा कुमार साहू यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. प्राध्यापकांविरुद्ध कारवाई न केल्याच्या आरोपामुळे दुःखी झालेल्या या विद्यार्थिनीने शनिवारी महाविद्यालयाच्या आवारात स्वतःला पेटवून घेतले. या घटनेत ती ९५ टक्के भाजली होती. घटनेच्या सुमारे ६० तासांनंतर सोमवारी रात्री भुवनेश्वरमधील एम्समध्ये तिचा मृत्यू झाला.
आत्महत्या करण्यापूर्वी काही दिवस आधी विद्यार्थिनीने आयसीसी म्हणजेच अंतर्गत तक्रार समितीला लिहिलेले एक पत्रही समोर आले आहे. विद्यार्थिनीने स्पष्टपणे सांगितले होते की, एचओडी तिच्यावर लैंगिक संबंधांसाठी वारंवार दबाव आणत होते. तसेच ते विद्यार्थिनीला नापास करण्याची धमकी देत असल्याचा आरोपही तिने केला होता. जर कारवाई केली नाही तर आत्महत्या करेल असे विद्यार्थिनीने पत्रात म्हटले होते.