दाढी, शेंडी कापण्यावरून कैद्याला तुरुंगात मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 05:39 AM2019-12-18T05:39:54+5:302019-12-18T05:40:08+5:30

आर्थर रोड कारागृहातील १२३ पैकी ९८ कॅमेरे वारंवार पडतात बंद

Prisoner beaten in jail after cutting beard, shandy | दाढी, शेंडी कापण्यावरून कैद्याला तुरुंगात मारहाण

दाढी, शेंडी कापण्यावरून कैद्याला तुरुंगात मारहाण

googlenewsNext


मनीषा म्हात्रे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आर्थर रोड कारागृहात दाढी, शेंडी कापण्यावरून कैद्याला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी कारागृह प्रशासनाकडे तक्रार केली आहे. हे प्रकरण न्यायालयात पोहोचताच न्यायालयाने घटनेच्या दिवसाच्या सीसीटीव्हीची मागणी केली, तेव्हा कारागृह प्रशासनाने सीसीटीव्ही जुने झाल्याने बंदावस्थेत असल्याची माहिती न्यायालयाला दिली आहे.
अंडर ट्रायल असलेल्या हर्षद उर्फ मुन्ना राजीवभाई सोलंकी आणि मफतलाल मणिलाल गोहील हे एकाच बॅरेकमध्ये होते. ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १२च्या दरम्यान हर्षदला शेंडी आणि दाढी कापण्यावरून मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला आहे. हर्षदने तुरुंग भेटीदरम्यान वकीलाला ही बाब सांगताच हा प्रकार समोर आला. त्यानुसार, हर्षदचे वकील प्रकाश साळसिंगीकर यांनी एनएमजोशी मार्ग पोलिसांसह, आर्थर रोड कारागृहाकडे तक्रार केली. हर्षदला मारहाण झाली, तेथे सीसीटीव्ही असल्याने साळसिंगीकर यांनी सीसीटीव्ही फुटेजबाबत मागणी केली. त्यानुसार, २७व्या शहर सत्र न्यायालयाने सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याचे आदेश कारागृह प्रशासनाला दिले. तसेच, कारागृहाबाहेरील रुग्णालयात वैद्यकीय उपचार करण्यास सांगितले.
त्यानुसार, १४ डिसेंबर रोजी आर्थर रोड कारागृहाकडून न्यायालयाला सादर केलेल्या अहवालात, त्यांनी मारहाणीचा आरोप नाकारला. शिवाय, मध्यवर्ती कारागृहात १२३ कॅमेरे आहेत. त्यापैकी ९८ कमेरे हे २०१३ ते २०१४ मधील असल्याने ते जुने झाले आहेत. त्यामुळे ते वारंवार बंद पडत आहेत. सदर कॅमेरे दुरुस्तीसाठीचे सुटे भाग बाजारात उपलब्ध होत नसल्याने अडचणी निर्माण होत असल्याचे सांगितले. याबाबत त्यांनी वरिष्ठांकडेही तक्रार केल्याचे नमूद केले आहे. त्यातही यंत्रणेत १४ ते १० दिवस एवढीच क्षमता असल्याने सदरचे सीसीटीव्ही फुटेज सादर करणे शक्य नसल्याचे त्यांनी न्यायालयाला कळविले आहे.
सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
या कारागृहात ८०० हून अधिक कैदी आहेत. अनेक बड्या कैद्यांना येथे ठेवण्यात येते. २६/११च्या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला येथेच ठेवले होते. त्यामुळे अशा ठिकाणी सीसीटीव्ही बंद असल्याने कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

धार्मिक बाबीत हस्तक्षेप करणे चुकीचे
हर्षद सोळंकीला झालेल्या मारहाणीत त्याचा कान फ्रॅक्चर झाला आहे. मारहाणीमुळे हे झाले असल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे, कैदी जरी असला, तरी त्याच्या धार्मिक बाबीत हस्तक्षेप करू नये. त्यामुळे दाढी, शेंडी कापण्यावरून मारहाण करणे चुकीचे आहे. या प्रकरणी संबंधितावर कारवाई व्हावी.
- प्रकाश साळसिंगीकर,
आरोपीचे वकील

Web Title: Prisoner beaten in jail after cutting beard, shandy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jailतुरुंग