कौटुंबिक वादातून गर्भवतीला पेटवले, पतीला अटक; कळवा पोलिसांत गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2021 07:41 IST2021-11-03T07:41:29+5:302021-11-03T07:41:37+5:30
कळव्यातील मफतलाल कॉलनीतील रहिवासी अनिल चौरसिया याने डोंबिवलीतील एका तरुणीशी दुसरा विवाह केल्याचा आरोप आहे.

कौटुंबिक वादातून गर्भवतीला पेटवले, पतीला अटक; कळवा पोलिसांत गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : पतीने दुसरे लग्न केल्याच्या संशयातून पती-पत्नीमध्ये वाद झाला. या वादातून गर्भवती पत्नीला पेटवून देणाऱ्या अनिल चौरसिया (३५) याला कळवा पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्याला ३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
कळव्यातील मफतलाल कॉलनीतील रहिवासी अनिल चौरसिया याने डोंबिवलीतील एका तरुणीशी दुसरा विवाह केल्याचा आरोप आहे. याच कारणावरून त्याचा पत्नीसोबत वारंवार वाद होत होता. ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा वाद पुन्हा उफाळून आला.
याच वादातून अनिलने सहा महिन्यांच्या त्याच्या गर्भवती पत्नीला रॉकेल टाकून पेटवून दिले. यात गंभीर जखमी झालेल्या महिलेला शेजाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. या हल्ल्यात गंभीर भाजल्यामुळे तिला बाळ गमवावे लागले. तिच्यावर मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात अनिलविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांच्या पथकाने त्याला १ नोव्हेंबर रोजी अटक केली.