एटीएम समजून पासबुक प्रिंटिंग मशीन नेणाऱ्या चोराला पकडण्यात पोलिसांना यश
By आप्पा बुवा | Updated: April 12, 2023 15:47 IST2023-04-12T15:46:47+5:302023-04-12T15:47:07+5:30
सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसणारी व्यक्ती ही जवळच राहत असल्याची पुष्टी मिळाल्यानंतर पोलिसांनी संशयताला अटक केली.

एटीएम समजून पासबुक प्रिंटिंग मशीन नेणाऱ्या चोराला पकडण्यात पोलिसांना यश
फोंडा : रविवारी रात्री खांडेपार येथील स्टेट बँकेच्या एटीएम बॉक्समधून एटीएम ऐवजी पासबुक प्रिंटिंग मशीन चोरलेल्या चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश आले असून संशयिताने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. सविस्तर वृत्तानुसार रविवारी रात्री गौतम कुमार (वय 29, राहणार खांडेपार, मूळ बिहार) याने चोरीच्या इराद्याने खांडेपार येथील एटीएम बॉक्समध्ये प्रवेश केला.
घाई गडबडीत त्याने एटीएम समजून तिथे असलेले पासबुक प्रिंटिंग मशीन उचलले व रात्रीच उड्डाण पुलावर नेऊन ते फोडून बघितले. मशीन फोडल्यानंतर त्याच्या लक्षात सर्व प्रकार आला व त्याने तोडलेले मशीन तिथेच टाकून पळ काढला होता. या संदर्भात बँकेचे व्यवस्थापक रोहित विश्वकर्मा यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. स्टेट बँकेच्या जवळ असलेले सीसीटीव्ही फुटेज व इतरत्र असलेल्या सीसीटीव्ही फुटेच्या आधारे पोलिसांनी माहिती गोळा केली.
सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसणारी व्यक्ती ही जवळच राहत असल्याची पुष्टी मिळाल्यानंतर पोलिसांनी संशयताला अटक केली. सदर चोरी प्रकरणात रोख रक्कम लंपास झाली नसली तरी मशीनची तोडफोड झाल्यामुळे बँकेला दीड लाखाचे नुकसान झाले आहे. फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांनी या कामी चांगली कामगिरी बजावली. पोलीस सब इन्स्पेक्टर आदित्य वेळीप, हेड कॉन्स्टेबल केदार जल्मी, आदित्य नाईक यांनी सदर तपासात महत्त्वाची भूमिका बजावली. पोलीस उपअधीक्षक आशिष शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या संदर्भात पुढील तपास चालू झाला आहे.