मदतीआड प्रलोभन; ‘त्या’ फोटोआड शोषण! गर्भधारणाही झाली, आरोपीविरुद्ध गुन्हा
By प्रदीप भाकरे | Updated: September 11, 2022 16:08 IST2022-09-11T16:07:15+5:302022-09-11T16:08:08+5:30
घरातून बेदखल करण्यात आलेल्या तरुणीला शहरात भाड्याची खोली करून दिल्यानंतर तिचेच लैंगिक शोषण करण्यात आले.

मदतीआड प्रलोभन; ‘त्या’ फोटोआड शोषण! गर्भधारणाही झाली, आरोपीविरुद्ध गुन्हा
अमरावती : घरातून बेदखल करण्यात आलेल्या तरुणीला शहरात भाड्याची खोली करून दिल्यानंतर तिचेच लैंगिक शोषण करण्यात आले. त्यातून तिला गर्भधारणा झाल्याची धक्कादायक बाब फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघड झाली. याप्रकरणी १० सप्टेंबर रोजी रात्री ९.३०च्या सुमारास आरोपी उमेश साहेबराव गजबे (रा. अमरावती) याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारीनुसार, आरोपी उमेशसोबत संबंध असल्याच्या कारणावरून पीडिताला तिच्या कुटुंबीयांनी घरातून बेदखल केले होते. जूनमध्ये तिला मारहाण करून घरातून काढून दिल्याने आरोपी उमेशने तिला अमरावती शहरात भाड्याची खोली पाहून देण्यात मदत केली. दरम्यान, त्याच महिन्यात एक दिवस तरुणी ही तिच्या खोलीत एकटी असल्याचा गैरफायदा घेत तुझे काही फोटो माझ्याकडे आहेत, ते व्हायरल केल्यास तू कुठचीच राहणार नाहीस, अशी धमकी देत तिच्यावर बळजबरी केली. त्यानंतर आरोपीने वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याने ती दोन महिन्यांची गर्भवती राहिली. त्यामुळे बदनामी टाळण्यासाठी पीडिताने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला.
मात्र, त्याने लग्न करण्यास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या पीडिताने १० सप्टेंबर रोजी रात्री फ्रेजरपुरा पोलीस ठाणे गाठले. ठाणेदार अनिल कुरळकर, पोलीस निरीक्षक नितीन मगर यांच्या नेतृत्वात महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तिचे बयाण नोंदवून घेतले.