पोलिसाने मागितली ६ लाखांची लाच, १ लाखाची लाच स्वीकारताना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2021 03:46 PM2021-01-04T15:46:21+5:302021-01-04T15:47:01+5:30

ACB Trap : ‘भरोसा’ सेलमध्ये केला ‘एसीबी’ने ट्रॅप

Police demand bribe of Rs 6 lakh, arrest while accepting bribe of Rs 1 lakh | पोलिसाने मागितली ६ लाखांची लाच, १ लाखाची लाच स्वीकारताना अटक

पोलिसाने मागितली ६ लाखांची लाच, १ लाखाची लाच स्वीकारताना अटक

googlenewsNext
ठळक मुद्देलाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांच्या नेतृत्वातील पथकाने ही कारवाई केली. 

यवतमाळ: फटाका विक्रीच्या दुकानावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची धाड पडू देत नाही, असे सांगून घाटंजी ठाण्यातील फौजदाराने सहा लाख रुपयांची मागणी केली होती. त्यातील एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना सोमवारी या फौजदाराला घाटंजी ठाण्यातील भरोसा सेलमध्ये रंगेहात अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांच्या नेतृत्वातील पथकाने ही कारवाई केली. 


राजाभाऊ त्र्यंबकराव घाेगरे असे या फौजदाराचे नाव आहे. घाटंजी  पोलीस ठाण्यात त्यांची नेमणूक आहे. यापूर्वी त्यांनी परिविक्षाधीन सेवा घाटंजी ठाण्यातच पूर्ण केली. मध्यंतरी त्यांची अमरावतीला बदली झाली. परिक्षेत्रीय बदल्यांमध्ये त्यांना पुन्हा यवतमाळ जिल्हा मिळाला. गेली काही दिवस ते नियंत्रण कक्षात कार्यरत होते. अलीकडेच ग्रामपंचायत निवडणूक बंदोबस्ताच्या निमित्ताने जिल्ह्यातील ३३ पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. त्यात पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ  घोगरे यांना घाटंजी ठाण्यात नेमणूक देण्यात आली. घाटंजीत त्यांचे जुनेच लागेबांधे होते. त्यातूनच त्यांनी धर्मशाळा वार्डातील फटाका व्यावसायिकाला हेरले. फटाक्याची अनधिकृत विक्री, साठेबाजी यावर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पथकाकडून धाड टाकली जाऊ शकते, कठोर कारवाई होऊ शकते, अशी भीती विक्रेत्याला दाखविण्यात आली.

ही धाड रोखण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक घोगरे यांनी त्या फटाका विक्रेत्याला सहा लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती एक लाखात सौदा ठरला. मात्र, पैसा द्यायचा नसल्याने फटाका विक्रेत्याने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. त्यावरून पोलीस उपअधीक्षक राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांनी सोमवारी दुपारी घाटंजीत सापळा रचून एक लाख रुपयांची रोकड स्वीकारताना फौजदार घोगरे यांना अटक केली. विशेष असे त्यांना पोलिसांच्या भरोसा सेलमध्ये ही लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईत एसीबीतील पोलीस निरीक्षक गजेंद्र क्षीरसागर, तसेच पोलीस कर्मचारी सचिन भोयर, गेडाम, वसीम शेख यांनी सहभाग घेतला. फौजदारावरील कारवाईने  जिल्हा पोलीस दलात खळबळ निर्माण झाली आहे.

Web Title: Police demand bribe of Rs 6 lakh, arrest while accepting bribe of Rs 1 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.