पाटण : गुजरातमध्ये काँग्रेसचे आमदार किरीट पटेल यांच्यासह २३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या सर्वांवर १६ डिसेंबर रोजी पाटण जिल्ह्यातील विद्यापीठात झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांवर हल्ला केल्याचा आरोप आहे.
पाटण विधानसभेचे आमदार किरीट पटेल, सिद्धपूरचे माजी आमदार चंदनजी ठाकोर आणि जवळपास २०० काँग्रेस कार्यकर्ते आणि पक्षाची विद्यार्थी संघटना नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या (NSUI) सदस्यांनी हेमचंद्राचार्य उत्तर गुजरात विद्यापीठात (HNGU) वसतिगृहात मद्यपान केल्याबद्दल निषेधार्थ आंदोनल केले होते.
आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी पाटण 'बी' विभाग पोलिसांनी आमदार पटेल आणि इतरांविरुद्ध आंदोलनादरम्यान पोलिसांना गैरवर्तन आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. माहिती देताना डीएसपी केके पंड्या यांनी सांगितले की, घटनेनंतर काही आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर किरीट पटेल आणि चंदनजी ठाकोर फरार झाले होते. मात्र, नंतर किरीट पटेल, चंदनजी ठाकोर आणि इतर १९ काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्थानिक पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
पुढे डीएसपी पंड्या पुढे म्हणाले, आम्ही यापूर्वीच १२ जणांना अटक केली होती. या सर्वांवर विद्यापीठात आंदोलनादरम्यान ड्युटीवर असलेल्या पोलिसांवर हल्ला करण्याचा आणि गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. त्यानुसार, गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.