लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: बदलापूर शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात एफआयआर नोंदणीबाबत बदलापूरपोलिसांकडून गैरवर्तन केले गेले, असे विभागीय पोलिस तक्रार प्राधिकरण, नवी मुंबईने आपल्या निकालात म्हटले आहे. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यास केलेल्या विलंबासंदर्भात प्रसिद्ध वृत्तांची स्वत:हून दखल घेत प्राधिकरणाने चौकशी केली.
२१ जानेवारी रोजी प्राधिकरणाचे अध्यक्ष पी. सी. बावस्कर, सदस्य सुधीर दाभाडे (निवृत्त आयपीएस) आणि सदस्य महेश भिंगार्डे यांनी हा निकाल दिला. १६ ऑगस्ट २०२४ रोजी एका मुलीचे पालक दुपारी २:०५ ला बदलापूर पोलिस स्टेशनमध्ये गेले होते. मात्र, गुन्हा रात्री १० वाजून २६ मिनिटांनी नोंदविण्यात आला. अशा प्रकरणात तातडीने गुन्हा दाखल करण्याची तरतूद असतानाही तेथील पोलिस वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभदा शितोळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक एस. पी. मोरे आणि पोलिस अंमलदार बाळकृष्ण फिरके यांनी विलंब केल्याचे पीडितेच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे.
या प्रकरणी उच्च न्यायालयानेही स्वत:हून याचिका दाखल करून घेतली. प्राधिकरणानेही चौकशी करण्याचा निर्णय घेतला. प्राधिकरणाने निवृत्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावता शिंदे यांना पाठवून त्यांच्यामार्फत चौकशी केली. शिंदे यांनी शितोळे, मोरे आणि फिरके यांना जबाबदार धरले.
पोलिस म्हणतात...
शितोळे यांनी कर्तव्यात कसून केल्याचे अमान्य केले. घटनेच्या दिवशी शाळेच्या आवारात आणि पोलिस ठाण्यात मोठा जमाव जमा झाला होता. आपण कायदा व सुव्यवस्था राखण्यात व्यस्त होतो. पीडितेला नीट जबाब देता येत नव्हता, म्हणून साध्या ड्रेसमधील एका महिला पोलिसाला तक्रार दाखल करून घेण्यास सांगितले, असे शितोळे यांचे म्हणणे हाेते. तर मोरे व फिरके यांनी सांगितले की, पीडित व तिचे नातेवाईक थेट शितोळे यांच्या केबिनमध्ये गेले. एका महिला पोलिसाने पेनड्राइव्ह व मुलीचा जबाब आणल्यानंतर तक्रार दाखल करून घेतली.
प्राधिकरणाचा निष्कर्ष
गुन्हा दाखल करण्याबाबत शितोळे, मोरे आणि फिरके यांच्याकडून जाणीवपूर्वक उल्लंघन किंवा दुर्लक्ष करण्यात आले. पीडिता व तिच्या नातेवाइकांच्या हक्कांवर प्रतिकूल परिणाम झाला असून, हा प्रकार गैरवर्तन ठरतो, असा निष्कर्ष प्राधिकरणाने काढला. मोरे व फिरके यांना तंबी देण्यात आल्याची दखल प्राधिकरणाने घेतली. हा निकाल सरकारच्या गृह विभागाला देण्याची सूचना प्राधिकरणाने सचिवांना केली.
स्कूल व्हॅनमध्ये अत्याचार; चालकास पोलिस कोठडी
बदलापूरमध्ये स्कूल व्हॅनमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचारप्रकरणातील आरोपीला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयातील पोक्सो विशेष न्यायालयात शुक्रवारी दुपारी हजर करण्यात आले. यावेळी न्यायाधीश व्ही.ए. पत्रावळे यांच्याकडे प्रकरणाची बंददार सुनावणी झाली. आरोपीला २७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. शाळा प्रशासनालाही पोलिसांनी चौकशीच्या फेऱ्यात घेतले असून स्कूल व्हॅन ताब्यात घेतली आहे. आरटीओकडून स्कूल व्हॅन चालविण्याचा परवानाही घेतला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे २४ हजार रुपयांचा दंड ठाेठावला. फॉरेन्सिक पथकाने स्कूल व्हॅनची तपासणी केली.
बाल हक्क आयोगाची भेट
बाल हक्क आयोगाचे सचिव लक्ष्मण राऊत यांनी बदलापूर येथे येऊन घटनेची माहिती घेतली. तपास अधिकाऱ्यांकडून यासंदर्भात अहवाल मागविला आहे. तपासात कोणत्याही त्रुटी राहता कामा नये, अशा सूचना दिल्या आहेत.
Web Summary : Police in Badlapur face misconduct allegations for delaying FIR in minor abuse case. Inquiry revealed negligence by officers. School van driver arrested; probe ongoing. Child Rights Commission intervened.
Web Summary : बदलापुर में नाबालिग दुर्व्यवहार मामले में एफआईआर में देरी के लिए पुलिस पर दुर्व्यवहार का आरोप। जांच में अधिकारियों द्वारा लापरवाही का खुलासा। स्कूल वैन चालक गिरफ्तार; जांच जारी। बाल अधिकार आयोग ने हस्तक्षेप किया।