पती, पत्नी और वो...अब्जाधीशाच्या सूनेची हत्या; सत्य समोर येताच पोलिसही हादरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2022 09:28 IST2022-10-01T09:28:37+5:302022-10-01T09:28:54+5:30
पीयूषचे वडील ओम प्रकाश देशातील प्रसिद्ध बिस्कीट कंपनी निर्माता आहेत. मुकेश आणि पीयूष ही त्यांची मुले. त्यातील पीयूष हा छोटा मुलगा आहे.

पती, पत्नी और वो...अब्जाधीशाच्या सूनेची हत्या; सत्य समोर येताच पोलिसही हादरले
कानपूर - एखाद्या गुन्ह्याचा शोध घेणे पोलिसांसाठी कुठल्याही आव्हानापेक्षा कमी नसतं. परंतु काही केसेस हायप्रोफाईल असतात ज्यामुळे पोलिसांची डोकेदुखी आणखी वाढते. कारण या प्रकरणांवर मीडिया, सरकार आणि जनता सगळ्यांचं लक्ष असतं. ८ वर्षापूर्वी कानपूर शहरात अशीच एक घटना उघडकीस आली. अब्जाधीश व्यावसायिकाच्या सूनेची हत्या. ज्याचा तपास करताना पोलीस अधिकारीही हैराण झाले होते.
२७ जुलै २०१४, कानपूरमध्ये त्यादिवशी रोजप्रमाणे नित्यक्रम सुरू झाला होता. दुपारची वेळ होती तेव्हा शहरातील बड्या उद्योजकाच्या मुलाने पोलिसांना कळवलं की, काही बाईकस्वार टोळक्यांनी त्यांना रस्त्यात अडवून पत्नीचं कारसह अपहरण केले आहे. त्याचसोबत मला मारहाण केली. व्यावसायिकाचा मुलगा आणि सून एका रेस्टॉरंटमधून घरच्या दिशेने जात होते. दुपारी १२.३० वाजता ही घटना घडली.
उद्योजकाच्या सूनेचं अपहरण
पोलिसांना फोन करून घटनेची माहिती देणारी व्यक्ती सामान्य नव्हती. ती शहरातील अब्जाधीश व्यावसायिक ओम प्रकाश दासानी यांचा ३० वर्षीय मुलगा पीयूष दासानी होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ पाऊलं उचलली. पीयूषच्या कारसह अपहरण झालेल्या पत्नीचा शोध सुरू झाला. पीयूषची अवस्था गंभीर होती. तोपर्यंत पीयूषची पत्नी ज्योतीच्या अपहरणाची बातमी वाऱ्यासारखी पसरली. दासानी कुटुंब आणि नातेवाईक एकत्र जमा होऊ लागले. पोलीस अधिकारी त्यांच्या घरी पोहचले.
पीयूषनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तो पत्नीसह एका रेस्टॉरंटमधून कारमध्ये बसून निघाले होते. रस्त्यात पत्नी ज्योतीने लाँग ड्राईव्हला जाण्याचा हट्ट केला. तेव्हा कंपनीच्या बाग चौकापासून रावतपूर रोडला ते निघाले. तेव्हा ४ दुचाकीस्वार टोळक्यांनी रस्त्यात जबरदस्तीने पीयूष यांची कार थांबवली. त्यांनी कारमधून बळजबरीने पीयूषला खाली उतरवले. त्यानंतर पत्नी ज्योतीला घेऊन ते फरार झाले. ज्योतीच्या मोबाईलवर २-३ वेळा कॉल केला तेव्हा कुणीतरी कॉल रिसीव केला. दुसरीकडून ज्योतीच्या ओरडण्याचा आवाज येत होता. वाचवा वाचवा असं ती ओरडत होती. अपहरणकर्त्यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर फोन कट झाला. पुन्हा कॉल उचललाच नाही. या घटनेनंतर पीयूषनं रस्त्याने जाणाऱ्या वाहनांची मदत मागितली तेव्हा एका दुचाकीवाल्याने लिफ्ट देत रावतपूरपर्यंत पोहचवलं. तिथे पीयूष स्टेशनला जात त्यांनी तक्रार नोंदवली.
पोलिसांनी तपास सुरू केला असता कानपूरच्या पनकी भागात पीयूष दासानी यांची कार जप्त करण्यात आली. कारच्या आतमध्ये ज्योती होती परंतु ती जिवंत नव्हती. तिची हत्या झाली होती. मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खूणा होत्या. ही बातमी कळताच दासानी कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला. अब्जाधीश व्यावसायिकाच्या सूनेची हत्या झाल्याचं शहरात पसरलं.
२०१२ मध्ये पीयूष आणि ज्योतीचं लग्न झालं होतं
पीयूषचे वडील ओम प्रकाश देशातील प्रसिद्ध बिस्कीट कंपनी निर्माता आहेत. मुकेश आणि पीयूष ही त्यांची मुले. त्यातील पीयूष हा छोटा मुलगा आहे. नोंव्हेबर २०१२ मध्ये जबलपूरचे व्यावसायिक शंकर लाल नागदेव यांची २४ वर्षीय कन्या ज्योतीसोबत लग्न झाले होते. ज्योती गृहिणी होती. पीयूषच्या पत्नीचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवली. पुरावे शोधण्यासाठी पथकं तयार केली. पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही. ज्योतीच्या मृतदेहाचं पोस्टमोर्टम होत असताना त्याच्या कुटुंबातील लोक उपस्थित होते. तेव्हा पोलिसांचं लक्ष पीयूषच्या टीशर्टकडे गेले. घटनेवेळी आणि पोस्टमोर्टमवेळी पीयूषचा टीशर्ट बदलला होता.
सीसीटीव्ही फुटेजनं हैराण
पोलिसांनी या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना एक अजब गोष्ट पाहायला मिळाली. पीयूष आणि ज्योती जेवायला बसले होते मात्र दोघांमध्ये काहीच संवाद होत नव्हता. पीयूष वारंवार कुणाशी तरी फोनवरून बोलत होता. पोलिसांची संशयाची सुई पीयूषभोवती फिरू लागली. पीयूषच्या टीशर्टवरून पोलिसांनी तपास सुरू झाला. ज्योतीचं अपहरण करताना अज्ञातांनी मारहाण केल्याचं सांगण्यात आले. परंतु पीयूषच्या शरीरावर कुठेही मारहाणीच्या खूणा नव्हत्या. अपहरण झाल्यानंतर १ तास का लावला? पीयूष यांच्याकडे मोबाईल होता इतकेच नाही तर घटनास्थळापासून काहीच अंतरावर पोलीस चौकी होती. पीयूषच्या जबाबात एकवाक्यता नव्हती.
ज्योतीच्या हत्येला ३ दिवस झाले होते. पोलिसांनी ज्योती आणि पीयूषच्या मोबाईलचा सीडीआर तपासला. पीयूषच्या मोबाईलवरून एक नंबर मिळाला ज्याच्याशी तो तासनतास बोलायचा. हा नंबर होता मनिषा मखीजा नावाच्या मुलीचा. घटनेच्या दिवसापर्यंत दोघांमध्ये खूप कॉल, मेसेज झाले. मनिषा ही पान मसाला कंपनीचे मालक हरीश मखीजा यांची मुलगी होती. जे पीयूषच्या बिस्किट कंपनीचे डिलर होते. पोलिसांनी पीयूषला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर मनिषालाही बोलावले. दोघांना आमनेसामने बसून चौकशी सुरू केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर अखेर दोघांनी गुन्हा कबूल केला.
पीयूषनेच रचलं हत्येचं षडयंत्र
पोलीस तपासात समोर आलं की, पीयूषनेच पत्नी ज्योतीच्या हत्येचं षडयंत्र रचलं. ज्यात ड्रायव्हर अवधेश आणि नोकर रेणूचा समावेश होता. या दोघांना ज्योतीच्या हत्येची सुपारी दिली होती. पीयूष आणि मनिषा यांच्यात अफेअर सुरू होतं. पीयूषला मनिषासोबत लग्न करायचं होते. त्यामुळे ज्योतीचा काटा काढण्याचा डाव पीयूषने रचला. पीयूष ज्योती कारच्या मागच्या सीटवर होते तर अवधेश कार चालवत होता. रेणू त्याच्या बाजूला बसली होती. रावतपूर येथे रस्त्यात अवधेशनं कार थांबवली अचानक धारदार शस्त्राने ज्योतीवर वार केले. त्यानंतर तिघेही कार तिथेच सोडून निघून गेले.