पुणे : घटस्फोटाच्या दाव्यासाठी पत्नी न्यायालयात न आल्याने शिक्षक पत्नीला शाळेतच रॉकेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नऱ्हे येथील जिल्हा परिषद शाळेत ही घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष नामदेव चव्हाण (वय ३९) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी आशा संतोष चव्हाण (वय ३८, रा. बेनकर वस्ती, धायरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष व आशा यांचा दहा ते बारा वर्षांपुर्वी विवाह झाला आहे. त्यांना दोन मुले आहेत. आशा याच नऱ्हे येथील जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षीका आहेत. दरम्यान दोघांमध्ये वाद आहेत. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयात दावा घटस्फोटासाठी दाखल आहे. दरम्यान दोन दिवसांपुर्वी न्यायालयात तारीख होती. परंतु, आशा या न्यायालयात तारखेला आल्या नाहीत. त्याचा राग संतोष याला आला होता. शुक्रवारी संतोष दुपारी पाऊणे तीन वाजण्याच्या सुमारास थेट शाळेत गेला. त्यावेळी आशा त्यांच्या सहकार्यांसोबत जेवण करत होत्या. तरीही संतोष यांने बाहेर चल मला तुझ्याशी बोलायचे आहे, असे म्हणून त्यांना बाहेल बोलावले. दोघे जिन्यावर आल्यानंतर संतोषने न्यायालयात तारखेला का आली नाही, असे म्हणत वाद घातला. तसेच, पिशवीत बॉटलमध्ये आणलेले रॉकेल बाहेर काढून थांब तुला आता पेटवून संपवुन टाकतो. तुला आज खल्लासच करतो असे म्हणत बाटलीतील पेट्रोल अंगावर टाकले. तसेच, त्यानंतर काडीपेटीची काडी दोन वेळा ओढून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु, फिर्यार्दींनी आरडा-ओरडा करत गोंधळ घातल्याने शाळेतील इतर शिक्षक तसेच शिपाई धावत आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी अधिक तपास सहायक निरीक्षक ज्योती गडकरी या करत आहेत.
पुण्यात शिक्षक पत्नीला शाळेतच रॉकेल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 17:38 IST
घटस्फोटाच्या दाव्यासाठी पत्नी न्यायालयात न आल्याने शिक्षक पत्नीला शाळेतच रॉकेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पुण्यात शिक्षक पत्नीला शाळेतच रॉकेल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
ठळक मुद्देनऱ्हे येथील जिल्हा परिषद शाळेतील घटना याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल