धक्कादायक! धावत्या ट्रेनमध्ये महिलेवर बलात्कार; एकही प्रवासी पीडितेच्या मदतीला धावला नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 13:10 IST2021-10-17T13:09:37+5:302021-10-17T13:10:54+5:30
लोकलमधील कॅमेऱ्यात संपूर्ण घटना कैद; पुढील स्टेशनवर पोलिसांकडून आरोपीला बेड्या

धक्कादायक! धावत्या ट्रेनमध्ये महिलेवर बलात्कार; एकही प्रवासी पीडितेच्या मदतीला धावला नाही
फिलाल्डेफिया: अमेरिकेच्या फिलाल्डेफियामध्ये चालत्या ट्रेनमध्ये महिलेववर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार लोकल ट्रेनमधील सीसीटीव्हीत कैद झाला. धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार घडला, त्यावेळी लोकलमध्ये अनेक प्रवासी होते. मात्र कोणीही आरोपीला अडवण्याचा प्रयत्न केला नाही. पीडितेच्या मदतीला कोणीही धावलं नाही.
पेन्सिलवेनिया वाहतूक प्राधिकरणातील एका कर्मचाऱ्यानं घडलेला प्रकार समोर आणला. लोकल ट्रेनमध्ये एका महिलेवर बलात्कार झाल्याची माहिती त्यानं दिली. यानंतर पुढच्याच रेल्वे स्थानकावर पोलिसांनी महिलेची सुटका केली आणि आरोपीला बेड्या ठोकल्या. महिलेची प्रकृती बिघडली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलीस अधिकारी टिमोथी बर्नहार्ट यांनी दिली.
धावत्या ट्रेनमध्ये महिलेवर बलात्कार करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव फिस्टन आहे. पीडितेनं तिच्यासोबत घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती पोलिसांना दिल्याचं बर्नहार्ट यांनी सांगितलं. 'आरोपी महिलेवर बलात्कार करताना लोकलमध्ये बरेच प्रवासी होते. त्यातल्या कोणीतरी महिलेची मदत करायला हवी होती. मात्र कोणीही तिच्या मदतीला धावलं नाही. ही बाब अतिशय धक्कादायक आणि चिंताजनक आहे. समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत, याचा विचार करण्याची गरज आहे,' असं बर्नहार्ट म्हणाले.