परभणीत बनावट खत, औषधींच्या कारखान्यावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 19:06 IST2018-07-20T19:04:32+5:302018-07-20T19:06:09+5:30
शहरातील खानापूर ते पिंगळी रस्त्यावर सुरू असलेल्या बनावट खत व औषधींच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला.

परभणीत बनावट खत, औषधींच्या कारखान्यावर धाड
परभणी : शहरातील खानापूर ते पिंगळी रस्त्यावर सुरू असलेल्या बनावट खत व औषधींच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला. यात मोठ्या प्रमाणात बनावट खत व औषधी बनविण्याचे साहित्य जप्त केले.
पिंगळी रोडवरील एका पत्र्याच्या शेडमध्ये हा कारखाना सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांना मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक दिलीप झळके, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा छापा टाकण्यात आला. छापा टाकला त्यावेळी रिकाम्या बॉटल्स, मोठे कंटेनर, बनावट केमिकल, विविध कंपन्यांचे रॅपर, स्टिकर्स, प्लास्टीक, मोठ-मोठे बॉक्स या ठिकाणी आढळून आले. तसेच पॅकींग करण्याचे साहित्यही पोलिसांनी जप्त केले आहे.
कृषी अधिकाऱ्यांमार्फत या बनावट खत, औषधींची मोजणी सुरू असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता. दरम्यान, या कारवाईमुळे बनावट खत, औषधीं बनविणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश झाला आहे.