One was stoned to death in Akola | अकोल्यात युवकाची दगडाने ठेचून हत्या; आरोपी आठ तासांत जेरबंद

अकोल्यात युवकाची दगडाने ठेचून हत्या; आरोपी आठ तासांत जेरबंद

ठळक मुद्देखुन झालेल्या व्यक्तीचे नाव श्याम शंकर घोडे असल्याची माहिती समोर आली.घटनास्थळावर दोन चिलीम आणि रक्ताने माखलेला दगड आढळून आला आहे.

अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेहरू पार्क चौकात एका ३२ वर्षीय युवकाची हत्या त्याच्या साथीदाराने केल्याची घटना रविवारी पहाटे उघडकीस आली. या हत्याकांडातील आरोपीस अकोला पोलिसांनी आठ तासांच्या आतच जेरबंद केले. त्याला सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

खदान परिसरातील शासकीय गोदाममागे रहिवासी असलेले श्याम शंकर घोडे यांची उत्तर प्रदेशातील रामपूर येथील रहिवासी सुमितकुमार राजेश कुमार शर्मा याने शनिवारी मध्यरात्री दगडाने ठेचून हत्या केली. या दोघांनी सोबतच नशा केल्यानंतर नशेतच शर्मा याने घोडे याच्या डोक्यावर दगड टाकला. यामध्ये घोडे यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी शर्मा हा घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेची माहिती रविवारी पहाटे खदान पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांकडून घटनास्थळ पंचनामा केला. याप्रकरणी खदान पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आठ तासांच्या आतच आरोपी सुमितकुमार शर्मा यास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याची माहिती समोर आली आहे. या हत्याकांड प्रकरणातील आरोपीस सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

 

घटनास्थळावर आढळल्या चिलमी

नेहरू पार्क चौकात ज्या ठिकाणी श्याम घोडे यांचा मृतदेह पडून होता. त्याच बाजूला नशेसाठी वापरलेल्या दोन चिलमी पोलिसांना आढळले आहे. त्या चिलमी पोलिसांनी जप्त केले आहेत. यावरून मृतक व आरोपीने सोबतच नशा केल्याची माहिती पोलिसांनी दिली. नशेतच हे हत्याकांड घडलेची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

क्षुल्लक कारणावरून झाली हत्या

नेहरू पार्क चौकात श्याम घोडे व त्याचा साथीदार सुमित कुमार शर्मा या दोघांनी सोबतच नशा केली. त्यानंतर किरकोळ वाद दोघांमध्ये निर्माण झाले. या किरकोळ वादातून सुमित कुमार शर्मा याने बाजूलाच पडलेला दगड उचलून क्षणातच त्या घोडे याच्या डोक्यात घातला. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. अत्यंत किरकोळ कारणातून हत्याकांड झाले. यापूर्वी तपे हनुमान मंदिरानजीक अशाप्रकारे नशेत एका मित्राने दुसर्‍याची हत्या केल्याचे प्रकरण घडले होते.

Web Title: One was stoned to death in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.