ठाणे - मुंबईकरांची लाईफलाईन आता दिवसेंदिवस डेथलाईन होत चालली आहे. रेल्वेवरचा प्रवास हा सुखकर होण्याऐवजी घातक होत चालला आहे. कळवा आणि मुंब्रा या स्थानकांदरम्यान तीन प्रवासी लोकलमधून पडून अपघात घडला आहे. यापैकी दोन प्रवासी जखमी झाले असून एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. सकाळच्या लोकलमधील गर्दीने पुन्हा एका प्रवाशाचा बळी घेतल्याची घटना बुधवारी कळवा रेल्वेस्थानकादरम्यान घडली. तसेच अन्य दोघे प्रवासीही लोकलमधून पडून गंभीररीत्या जखमी झाले असून ते तिघेही मुंब्रा रेल्वेस्थानकात लोकलमध्ये चढले होते. यातील मयत हा लग्नासाठी उत्तर प्रदेश येथून मुंबईत आला होता. तिघांची ओळख पुढे आली असली, तरी ते तिघे एकाच वेळी एकाच लोकलमधून पडले आहेत का? याबाबत अद्याप काही स्पष्ट झाले नाही, अशी माहिती ठाणो लोहमार्ग पोलिसांनी दिली.
जखमींवर ठामपाच्या कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एसी लोकल सुरू करणाऱ्या रेल्वे प्रशासनाने गर्दीच्या वेळी साध्या लोकलची संख्या वाढविली, तर नाहक जाणारे बळी थांबतील, अशा संतप्त भावना प्रवाशांतून व्यक्त होत आहेत. बुधवारी सकाळी ९.५५ वाजण्याच्या सुमारास कळवा-खारेगाव फाटकाजवळ तीन इसम जखमी अवस्थेत पडल्याची माहिती कळवा रेल्वेस्थानकावरील बुकिंग क्लार्ककडून लोहमार्ग पोलिसांना समजली. त्यानुसार, लोहमार्ग पोलीस हे हमाल अणि स्ट्रेचर घेऊन तेथे पोहोचले. त्यावेळी एका व्यक्तीला स्थानिकांनी कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेले होते. तसेच एक जण जागीच मयत झाला होता. तिसऱ्यालाही रुग्णालयात तातडीने नेले.
लोकलच्या धडकेने राष्ट्रवादीच्या कार्यालयीन सचिवाचा मृत्यू
लाइफलाइन डेथलाइन होण्यापासून रोखणे गरजेचे
लोकलमधून पडून तिघे जखमी; तरुणीसह दोन तरुणांचा समावेश
जखमी मोहम्मद अबू ओसामा शेख (२३) आणि इम्तियाज गुलाम हैदर (४२) हे जखमी असलेले दोघे मुंब्य्रात राहणारे आहेत. त्यातील मोहम्मद हे बोलण्याच्या स्थितीत नव्हते. तर, इम्तियाज हे व्यवसायाने टेलर असून ते सकाळी मुंब्रा येथून सीएसएमटीला लोकल पकडून जात होते. त्यावेळी गाडीला गर्दी होती. ते दरवाजात उभे असताना गाडीने वेग घेतल्यावर त्यांचा हात सटकल्याने तोल जाऊन खाली पडले. त्याच डब्यातून इतर कुणास पडलेले पाहिले नसल्याचे त्यांनी ठाणो जीआरपीला सांगितले. तसेच तिसरा मयत हाजी रईस अहमद (५३) हे मूळ उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहेत. ते मुंबईत लग्नासाठी आले होते. बुधवारी लग्न असल्याने ते लग्नासाठी लोकल पकडून मुंबईला जात होते. त्यावेळी लोकलमधून पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती ठाणो लोहमार्ग पोलिसांनी दिली.