महिला प्रवाशाच्या पर्समधून एक लाखाची पोत लंपास, वाशिमची घटना
By सुनील काकडे | Updated: February 20, 2023 17:37 IST2023-02-20T17:37:34+5:302023-02-20T17:37:52+5:30
एसटी बसमध्ये घडला प्रकार, चोरटा झाला फरार

महिला प्रवाशाच्या पर्समधून एक लाखाची पोत लंपास, वाशिमची घटना
सुनील काकडे, वाशिम: जिल्ह्यातील रिसोड येथून औरंगाबादकडे जाणाऱ्या बसमधून प्रवास करणाऱ्या रिसोडातील महिला प्रवाशाच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने १ लाख रुपये किमतीची सोन्याची पोत लंपास केली. हा प्रकार २० फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास उघडकीस आला. दाखल फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, रिसोड शहरातील आसन गल्ली परिसरात वास्तव्याला असलेल्या कविता संतोष हमाने ह्या जालना येथे जाण्याकरिता रिसोड-औरंगाबाद बसमध्ये चढल्या. बसचा प्रवास सुरू होऊन रिसोड शहरातीलच मालेगाव नाका येथे बस पोहोचल्यानंतर पर्समधून सोन्याची दोन तोळे वजनाची पोत आणि ४ हजार रुपये रोख रक्कम गायब असल्याचे कविता हमाने यांच्या लक्षात आले. हा प्रकार उघडकीस येताच बसमध्ये मोठी खळबळ माजली. त्यानंतर पुढचा प्रवास थांबवून चालकाने बस रिसोड पोलीस स्टेशनमध्ये आणून उभी केली. त्याठिकाणी बसमधील सर्व प्रवाशांची झडती घेण्यात आली; मात्र सोन्याची पोत कोणाकडेही आढळून आली नाही. याबाबत कविता हमाने यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.