कार चालकाच्या खिशातून एक लाख रुपये काढले, पोलिसाचे निलंबन
By अनिल गवई | Updated: October 4, 2022 19:42 IST2022-10-04T19:41:57+5:302022-10-04T19:42:53+5:30
चौकशीअंती पोलीस काँन्स्टेबल गजानन हिवाळे निलंबित

कार चालकाच्या खिशातून एक लाख रुपये काढले, पोलिसाचे निलंबन
लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव: हवालाच्या नोटा घेऊन जात असलेल्या कार चालकाच्या खिशातून एक लाख रुपये काढल्याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्सटेबल गजानन हिवाळे यांना अखेर निलंबित करण्यात आले. या प्रकरणी साक्ष आणि चौकशीअंती हिवाळे यांना पोलीस अधिक्षकांनी तडकाफडकी एका आदेशान्वये निलंबित केले आहे.
गेले दोन ते अडीच महिन्यापूर्वी अकोल्यावरून नाशिककडे जाणाऱ्या कारमध्ये पैसे असल्याची माहिती अपर पोलीस अधिक्षक पथकाला मिळाली. या माहितीवरून एएसपी पथक आणि शहर पोलीसांनी ही गाडी नांदुरा रोडवर पाठलाग करून पकडली होती. कारमध्ये ६५ लाख रुपये होते. कारमध्ये चालकासह दोन जण होते. मागील सीटमधून पोलीसांनी ६५ लाख रुपये जप्त केले होते. त्याचवेळी चालकाने दिलेल्या साक्षीनुसार, आपल्या खिशातूनही एक लाख रुपये पोलीस कर्मचाऱ्याने काढल्याची माहिती दिली.
पैसे काढणाऱ्या कर्मचाऱ्यास आपण ओळखत असल्याचेही त्याने स्पष्ट केले. त्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षकांनी केलेल्या चौकशीत पोलीस काँन्स्टेबल गजानन हिवाळे यांचे नाव समोर आले. त्यामुळे हिवाळे यांना ३ ऑक्टोबर रोजी जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया यांनी एका आदेशान्वय निलंबीत केले आहे. या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
सूत्रधार बचावला!
चालकाच्या खिशातून रक्कम काढण्याचा बेत दोघांनी आखला होता. वरिष्ठ सहकाऱ्याच्या इशाऱ्या वरूनच ही मोहिम फत्ते झाली. घटनेनंतर संबंधितांमध्ये ५०-५० ची वाटाघाटी झाली होती. मात्र, चौकशीत सुत्रधार अलिप्त राहिला. यावेळी चालकाशी झालेल्या झटापटीत एक जण जखमीही झाला. तथापि, संशयाचा फायदा घेत, हिवाळे यांना निलंबित करण्यात आल्याची जोरदार चर्चा मंगळवारी दिवसभर पोलीस वर्तुळात होती.