धुऱ्याच्या वादातून एकाची हत्या; तरोडानाथ येथील घटना, दोघांविरोधात गुन्हा दाखल
By अनिल गवई | Updated: September 27, 2022 17:10 IST2022-09-27T17:04:34+5:302022-09-27T17:10:14+5:30
आरोपीला पिंपळगाव राजा पोलिसांनी केली अटक

धुऱ्याच्या वादातून एकाची हत्या; तरोडानाथ येथील घटना, दोघांविरोधात गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव: धुऱ्याच्या वादातून एकाने शेजाऱ्याची हत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी खामगाव तालुक्यातील तरोडा नाथ येथे घडली. रघुवीर हरदास घोती (६५) असे मृतकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आरोपीला पिंपळगाव राजा पोलिसांनी अटक केली आहे.
खामगाव तालुक्यातील तरोडानाथ येथील रघुवीर हरदास घोती (६५) आणि देवराम काशिराम वाघमोडे (६०) यांचे शेत शेजारी शेजारी आहे. मंगळवारी सकाळी दोघांमध्ये शेतात असताना धुऱ्यावरून त्यांच्यात वाद झाला. वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. त्यानंतर देवराम काशिराम वाघमोडे याने रघुवीर घोती यांच्या छातीत वीट फेकून मारली. वाघमोडे याने केलेला प्रहार एवढा घातक होता की रघुवीर घोती हा वृध्द इसम जागीच कोसळून ठार झाला. घटनेनंतर आरोपीने घटना स्थळावरून पळ काढला.
या घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव राजा पोलीस घटनास्थळी तळ ठोकून आहेत. आरोपी पळून जात असतानाच, ठाणेदार सतीश आडे यांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी पिंपळगाव राजा पोलिसांनी देवराम काशीराम वाघमोडे याला अटक केली असून ब्रदीनाथ रघुवीर घोती (३८) यांच्या तक्रारीवरून पावशीराम काशीराम वाघमोडे यांच्या विरोधात भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.