कधी इस्रोचा वैज्ञानिक; तर कधी बनला सुटाबुटातील ‘साहेब’; श्रीमंत तरुणींना गंडविणाऱ्या महाठगाला अखेर बेड्या
By सूर्यकांत वाघमारे | Updated: March 5, 2026 06:54 IST2026-03-05T06:54:37+5:302026-03-05T06:54:49+5:30
विवाहेच्छुक मुला-मुलींची ऑनलाइन स्थळे जुळवताना प्रत्यक्षात माणसे पारखायला मिळत नसल्याने फसवणुकीच्या घटना घडत आहेत.

कधी इस्रोचा वैज्ञानिक; तर कधी बनला सुटाबुटातील ‘साहेब’; श्रीमंत तरुणींना गंडविणाऱ्या महाठगाला अखेर बेड्या
- सूर्यकांत वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : विवाहानंतर अलिशान जीवन जगण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणींना तो बरोबर हेरत होता. त्यानंतर या तरुणी त्याच्या सुट-बुट अशा थाटातील त्याच्या जीवन शैलीला भूलून आर्थिक फसवणूक किंवा लैंगिक शोषणला बळी पडत. विशेष म्हणजे तो कधी इस्रोचा शास्त्रज्ञ तर कधी उच्च पदस्थ अधिकारी असल्याचा दावा करून वाढत्या वयाच्या मुलींना ‘सॉफ्ट टार्गेट’ करत होता. या महाठगाला नवी मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
विवाहेच्छुक मुला-मुलींची ऑनलाइन स्थळे जुळवताना प्रत्यक्षात माणसे पारखायला मिळत नसल्याने फसवणुकीच्या घटना घडत आहेत. अशाच प्रकरणात नवी मुंबई गुन्हे शाखा पोलिसांनी आदर्श म्हात्रे (वय ३४) याला अटक केली. तो मूळचा अलिबागचा आहे. केंद्र सरकारच्या एका विभागात नोकरीला असलेल्या त्याच्या पत्नीने आदर्शचे कारनामे समोर आल्यानंतर २०१९ मध्ये घटस्फोट घेतला.
पूर्व मंजूर कर्जाचा असाही फायदा
आदर्श हा गळाला लागलेल्या मुलीकडे कोणते क्रेडिट कार्ड आहे हे तपासायचा. त्यात पूर्व मंजूर कर्जाची सुविधा (प्री अप्रूव्ह लोन) असणारे कार्ड असल्यास तिला लाखो रुपयांचे कर्ज काढण्यास भाग पाडायचे. ते पैसे हाती मिळाल्यानंतर काही दिवसातच तो संपर्क तोडत होता.
नाव आदर्श पण,
कामे केली ठगाची
आदर्श हा मॅट्रिमोनियल साईटवर बनावट प्रोफाईल बनवायचा. त्यामध्ये तो कधी इस्रोचा वैज्ञानिक, कधी शासकीय अधिकारी किंवा व्यावसायिक असल्याचे दाखवत होता. तो महागड्या कारसोबत किंवा पंचतारांकित हॉटेलमधले फोटो प्रोफाईलला ठेवायचा. जी मुलगी गळाला लागेल तिला विश्वासात घेऊन उज्ज्वल भविष्याचे स्वप्न दाखवायचा. त्यातून गुंतवणुकीसाठी लाखो रुपये तरुणींकडून उकळायचा. त्यात काही तरुणींचे लैंगिक शोषणही झाले आहे. अशीच एक तक्रार रबाळे पोलिस ठाण्यात तोतया वैज्ञानिक विरोधात दाखल झाली होती. त्याच्याच तपासात आदर्श हा ठग पोलिसांच्या हाती लागला आहे.
महिन्याभरात साधायचा डाव
मॅट्रिमोनियल साईटवर प्रोफाइल बनवल्यानंतर तिच्या व्हेरीफिकेशनसाठी महिन्याचा कालावधी असतो. या कालावधीतच तो गळाला लागतील अशा मुलींना शोधायचा. त्याने फसवणूक केलेल्या तरुणींमध्ये अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
गोव्याच्या कॅसिनोत थाट
आदर्श हा पैसे गोव्याच्या कॅसिनोत उडवत होता. यामुळे त्याला वापरासाठी लक्जरी कार, पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली करण्यात येत होती. त्याचा हाच थाट पाहून मुली लग्नाला होकार द्यायच्या. त्याने कॅसिनोत ८९ लाख रुपये उधळले होते. ती सर्व रक्कम संबंधित महिलांच्या खात्यात जमा करण्यास गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक
सुनील शिंदे यांनी कॅसिनोला कायद्याने भाग पाडले.