उल्हासनगर - कॅम्प नं- 5 येथील इमारती मध्ये वॉचमन असलेल्या 66 वर्षीय वृद्धाने शेजारी राहणाऱ्या 5 वर्षीच्या चिमुकलीवर अत्याचार केला. याप्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून वृद्धाला पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीला ४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
उल्हासनगर कॅम्प नं - 5 येथे नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असून तेथे नेपाळी पहारेकरी आहे. इमारतीशेजारी नेपाळी कुटुंब राहत असून ते कुटुंब पहारेकऱ्याचे काम करते. नेपाळी पहारेकऱ्याचा सहकारी देखील जवळच राहत असून या सहकाऱ्याच्या कुटुंबात 5 वर्षाची मुलगी आहे. ती नेपाळी पहारेकऱ्याच्या घरी खेळण्यासाठी आली असताना वृद्धाने मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून रस्त्यात अडवून अत्याचार केला. मुलीने रडत घरी येऊन झालेला प्रकार आईला सांगितला. आईने हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर पोलिसांनी पॉक्सोचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.