नागपुरात वृद्ध चौकीदाराची हत्या : डोक्यावर मारले फटके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 22:49 IST2020-02-22T22:48:49+5:302020-02-22T22:49:29+5:30
स्टील कंपनीत चौकीदारी करणाऱ्या एका वृद्धाच्या डोक्यावर फटके मारून त्यांची हत्या करण्यात आली. शनिवारी सकाळी ९.३० च्या सुमारास चिखली चौक परिसरात ही घटना उघडकीस आली.

नागपुरात वृद्ध चौकीदाराची हत्या : डोक्यावर मारले फटके
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्टील कंपनीत चौकीदारी करणाऱ्या एका वृद्धाच्या डोक्यावर फटके मारून त्यांची हत्या करण्यात आली. शनिवारी सकाळी ९.३० च्या सुमारास चिखली चौक परिसरात ही घटना उघडकीस आली. त्यानंतर परिसरात खळबळ निर्माण झाली. नामदेवराव मंगरूजी बावणे (वय ६९) असे मृताचे नाव असून ते विनोबा भावेनगरात राहत होते.
गेल्या चार महिन्यांपासून बावणे चिखली चौकातील आर. जी. स्टील इंडस्ट्रीजमध्ये चौकीदार म्हणून काम करत होते. नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री ते घरून कर्तव्यावर गेले. शनिवारी सकाळी त्यांचा मृतदेह पडून आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच कळमना ठाणे तसेच गुन्हेशाखा पोलिसांचा ताफा तेथे पोहचला. त्यांनी आरोपींचा छडा लावण्यासाठी आजूबाजूच्यांना विचारणा केली. मात्र, कुणीही मारेकºयाबाबत फारशी माहिती दिली नाही. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले. मात्र, त्यातून पक्का धागा मिळेल, अशी कोणतीही माहिती पोलिसांच्या हाती लागली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री कंपनी परिसरात दोन-तीन आरोपी संशयास्पद फिरत दिसल्याने बावणे यांनी त्यांना हटकले. त्यामुळे आरोपींनी बावणे यांच्या डोक्यावर लाकडी दांड्याने फटके मारले. बावणे यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपींनी त्यांना खुर्चीवर बसवून तेथून पळ काढला. दरम्यान, शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. तेव्हापासून पोलीस त्या संशयितांचा माग काढत होते. वृत्त लिहिस्तोवर आरोपींचा छडा लागला नव्हता.
कारण गुलदस्त्यात
वृद्ध चौकीदाराने हटकले म्हणून कुणी त्याची हत्या करेल, हा मुद्दा पोलिसांना पटेनासा आहे. बावणे यांना पत्नी आणि दोन मुले असल्याचे समजते. त्यांनी वृद्ध बावणे यांचे कुणाशी वैमनस्य नसल्याचे सांगितले. त्यामुळे या हत्येच्या मागे नेमके कोणते कारण असावे,असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पोलीस या प्रश्नाचे उत्तर शोधत आहेत.