नागपुरात तेलाच्या व्यापाऱ्याची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 21:20 IST2020-01-04T21:20:16+5:302020-01-04T21:20:51+5:30
तेलाच्या व्यापाऱ्याशी व्यावसायिक करार करून माल घेतल्यानंतर दोघांनी त्यांना सव्वाचार लाखांचा गंडा घातला. ११ ते २७ डिसेंबर २०१९ दरम्यान ही बनवाबनवीची घटना घडली.

नागपुरात तेलाच्या व्यापाऱ्याची फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तेलाच्या व्यापाऱ्याशी व्यावसायिक करार करून माल घेतल्यानंतर दोघांनी त्यांना सव्वाचार लाखांचा गंडा घातला. ११ ते २७ डिसेंबर २०१९ दरम्यान ही बनवाबनवीची घटना घडली. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी शुक्रवारी दोन ठगबाजांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
नीतेश प्रभाकर बेलगे (वय ३९) यांचा गोंदियाला तेलाचे कारखाना आहे. ते शेषनगर, खरबी मार्गावर राहतात. त्यांच्याशी आरोपी हितेश अतवानी आणि अजहरुद्दीन नामक दोघांनी ११ डिसेंबरला संपर्क साधला. तेलाचा व्यवसाय करतो, असे सांगून त्यांनी बेलगेंना विविध प्रकारच्या तेलाची किंमत विचारली. त्यानंतर सौदेबाजी करून नागपूरकरिता वितरणशीप हवी असल्याचे सांगितले. व्यावसायिक करार झाल्यानंतर बेलगे यांच्याकडून आरोपींनी ५ लिटर फल्ली तेलाच्या १७१ कॅन (किंमत १ लाख ७७ हजार ८४० रुपये) आणि २ लाख ३९ हजारांचे जवस तेल असे एकूण ४ लाख १६ हजार ८४० रुपयांचे तेल घेऊन गेले. ठरल्याप्रमाणे दोन दिवसात पैसे द्यायचे होते. मात्र, आरोपींनी बेलगेंना तेलाचे पैसे दिलेच नाही. त्यामुळे बेलगेंनी आरोपींशी संपर्क साधला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बेलगेंनी नंदनवन ठाण्यात तक्रार नोंदवली. एपीआय शिर्के यांनी प्रकरणाचा तपास केला. त्यानंतर शुक्रवारी एपीआय जायभाये यांनी आरोपी हितेश आणि अजहरुद्दीनविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांचा शोध घेतला जात आहे.