राजकुमार जाेंधळे / लातूर : अहमदाबादच्या सायबर पाेलिस ठाण्यात एका रुग्णालयातील प्रसूतीदरम्यानचे चित्रीकरण व्हायरल केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात सांगली येथील एका विद्यार्थ्याला लातूर येथून गुजरात पाेलिसांनी रात्री अटक केली. तपासासाठी त्याला गुजरात पाेलिसांनी अहमदाबाद येथे नेले आहे.
पाेलिसांनी सांगितले, जत (जि. सांगली) येथील एक विद्यार्थी लातुरात नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी आला हाेता. दरम्यान, ताे गुजरात राज्यातील एका व्हाॅट्सॲप ग्रुपच्या संपर्कात आला. त्या व्हाॅट्सॲप ग्रुपवर गुजरात राज्यातील एका रुग्णालयातील आक्षेपार्ह चित्रीकरणाची क्लिप आल्यानंतर त्याने ती क्लिप साेशल मीडियात व्हायरल केली. या व्हायरल क्लिपने गुजरात राज्यात एकच खळबळ उडाली. याची अहमदाबाद पाेलिसांनी गंभीर दखल घेतली. या क्लिपची पडताळणी केल्यानंतर अहमदाबाद येथील सायबर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
साेशल मीडियात आक्षेपार्ह क्लिप व्हायरल करणारा व्यक्ती हा महाराष्ट्र राज्यातील लातूर शहरात वास्तव्याला असल्याची माहिती गुजरात पाेलिसांना मिळाली. त्यानेच ही क्लिप व्हायरल केल्याचे पुरावे हाती लागल्यचा आराेप गुजरात पाेलिसांचा आहे. त्याच्या ‘लाेकशेन’चा शाेध घेत अहमदाबाद येथील पाेलिस पथक लातूर शहरात धडकले. याबाबतची माहिती त्यांनी लातूर पाेलिसांनाही दिली. स्थानिक गुन्हे शाखा आणि शिवाजीनगर ठाण्याच्या पाेलिसांची मदत घेत त्या विद्यार्थ्याला नारायण नगर परिसरातील भाड्याच्या खाेलीतून उचण्यात आले. लातूर येथून त्याला अटक केल्यानंतर अधिक तपासासाठी गुजरातला नेले.
चित्रीकरण व्हायरल; विद्यार्थ्याच्या अंगलट
एक वर्षभरापूर्वी लातुरात आलेल्या सांगली जिल्ह्यातील जत येथील या विद्यार्थ्याने नारायण नगर येथे भाड्याने खाेली घेतली हाेती. ताे या खाेलीवर एकटाच राहत हाेता, असे शिवाजीनगर ठाण्याचे पाेलिस निरीक्षक दिलीप सागर म्हणाले. अधिक तपास गुजरातमधील अहमदाबाद सायबर पाेलिस ठाणे करत आहे. शिक्षण घेताना माेबाइलवर आलेली क्लिप इतरांना पाठविणे त्या विद्यार्थ्याच्या भलतेच अंगलट आले. ताे नीट परीक्षेसाठी रिपीटर म्हणून तयारी करत हाेता. मात्र, साेशल मीडियावर वेळ घालवत असल्याने, आराेपी विद्यार्थी गुजरातमधील एका व्हाॅट्सॲप ग्रुपच्या संपर्कात आला हाेता. त्यातून हा प्रकार घडल्याचे स्थागुशाचे सपाेनि. व्ही. पल्लेवाड म्हणाले.