Rajasthan Crime :राजस्थानच्या अलवरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहबाह्य प्रेम प्रकरणात एका महिलेने आपल्या पतीचा गळा कापून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर पोलिसही चक्रावून गेले.
पोलिसांनी सांगितले की, 9 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता नदीच्या काठावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. यानंतर दोन डझनहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले, तज्ज्ञ पथकाची मदत घेतली. संशयाच्या आधारे पोलिसांनी मृताच्या पत्नीला ताब्यात घेऊन चौकशी केली.
चौकशीत पत्नीने गुन्ह्याची कबुली दिली असून, पती दारू पिऊन मारहाण करायचा, असे तिने सांगितले. तसेच, ती मजुरीचे काम करायची, यादरम्यान तिचे सुभाष नावाच्या व्यक्तीवर प्रेम जडले. हा प्रकार तिच्या पतीला समजल्यानंतर प्रियकरसोबत राहण्यात अडथळे येत होते. यामुळे पत्नीने प्रियकर सुभाषच्या मदतीने पतीचा गळा कापून मृतदेह नदीकाठी फेकला.