दारूसाठी पैसे, बसायला खुर्ची दिली नाही; सुरक्षा रक्षकाच्या डोक्यात घातला दगड!
By प्रशांत माने | Updated: July 14, 2023 16:48 IST2023-07-14T16:46:51+5:302023-07-14T16:48:15+5:30
पश्चिमेकडील कोपर रोड येथील शास्त्रीनगर हॉस्पिटलच्या समोर पटेल आर मार्ट याठिकाणी सहानी बुधवारी मध्यरात्री सुरक्षा रक्षकाची ड्युटी बजावत होते.

दारूसाठी पैसे, बसायला खुर्ची दिली नाही; सुरक्षा रक्षकाच्या डोक्यात घातला दगड!
डोंबिवली: दारूसाठी पैसे देण्यास नकार देणाऱ्या सुरक्षा रक्षकाबरोबर वाद घालत त्याच्या डोक्यात दगडं घातल्याची घटना पश्चिमेकडील कोपर रोड परिसरात घडली. मुन्नीराम सहानी (वय ६०) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. तर या हल्लाप्रकरणी हर्षद कुशाळकर (वय २४) याला विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे.
पश्चिमेकडील कोपर रोड येथील शास्त्रीनगर हॉस्पिटलच्या समोर पटेल आर मार्ट याठिकाणी सहानी बुधवारी मध्यरात्री सुरक्षा रक्षकाची ड्युटी बजावत होते. पाऊस आल्याने तो दुकानासमोर आला आणि त्याने सहानी यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागत, बसण्यासाठी त्यांची खुर्ची मागतली. त्याला सहानी यांनी नकार दिला. याचा राग हर्षदला आला आणि त्याने शिवीगाळी आणी दमदाटी करीत सहानी यांच्यावर दगड आणि पेव्हरब्लॉकने हल्ला केला.
या घटनेत सहानी गंभीर जखमी झाले. गंभीर जखमी अवस्थेतील सहानी यांना सर्वप्रथम केडीएमसीच्या शास्त्रीनगर रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतू प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना मीरा रोड येथील खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान हल्ला करणाऱ्या हर्षदला अटक केली असून या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला आहे.