ग्रेटर नोएडा - उत्तर प्रदेशातील नोएडातील सिरसा गावात झालेल्या निक्की मृत्यू प्रकरणी रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. २१ ऑगस्टच्या संध्याकाळी घरातील आगीत भाजल्याने निक्कीला फोर्टिस हॉस्पिटलला आणले होते. जिथे डॉक्टरांनी एमएलसी रिपोर्टमध्ये डॉक्टरांनी घरातील गॅस सिलेंडर स्फोट झाल्याने गंभीर भाजल्याचा उल्लेख केला. डॉक्टरांच्या मेमोवर हॉस्पिटलनं शिक्कामोर्तब केल्यानंतर तो पोलीस स्टेशनला पाठवण्यात आला होता.
या प्रकरणी पोलीस अधिकारी धर्मेंद्र शुक्ल यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपासानंतर योग्य ती कारवाई केली जाईल. घटनेच्या वेळी निक्कीचा पती विपिनचा चुलत भाऊ देवेंद्रने निक्कीला हॉस्पिटलला नेले होते. तिथे सर्वात आधी डॉ. यसीन यांनी निक्कीला पाहिले. डॉक्टरांकडून एमएलसी रिपोर्ट तयार करण्यात आला. त्यात निक्कीला गंभीर अवस्थेत हॉस्पिटलला आणले होते हे लिहिलं. मृत्यूपूर्वी रुग्णालयात दिलेला निक्कीचा जबाब आरोपींना शिक्षा मिळवून देण्यासाठी महत्त्वाचा पुरावा ठरला. त्यामुळे घटनेनंतर ग्रेटर नोएडा येथील फोर्टिस हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे जबाब पोलिस नोंदवतील. यासोबतच हॉस्पिटलकडून मिळालेल्या मेमोला या प्रकरणात मुख्य आधार बनवले जाईल. जेणेकरून आरोपींना खून प्रकरणात शिक्षा होऊ शकेल आणि त्यांचा जामीन अर्ज फेटाळता येईल.
तर आरोपींनी अद्याप जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज केलेला नाही. मृत्यूपूर्वी निक्कीचा जबाब आरोपीविरुद्ध हत्येअंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यात महत्त्वाचा पुरावा ठरेल असं डीसीजी क्राईम ब्रह्मजित भाटी यांनी म्हटलं. दुसरीकडे निक्कीला घरातून फोर्टिस हॉस्पिटलमध्ये कारने नेण्यात आले. निक्की व्यतिरिक्त, तिची सासू दया, सासरे सतवीर आणि मेहुणे देवेंद्र त्या कारमध्ये उपस्थित होते असा आरोपीच्या कुटुंबाचा दावा आहे. देवेंद्र गाडी चालवत होता. रुग्णालयात पोहोचल्यानंतर ज्या डॉक्टर आणि नर्सने निक्कीला पहिले पाहिले, तोपर्यंत निक्की शुद्धीवर होती आणि बोलत होती. त्याच डॉक्टर आणि नर्सने विचारले असता, निक्कीने त्यांना सांगितले की घरात सिलेंडरच्या स्फोटामुळे ती भाजली आहे. ज्या डॉक्टर आणि नर्ससमोर निक्कीने सिलेंडरच्या स्फोटाबद्दल जवाब दिला होता, त्या दोघांचे जवाब पोलिसांनी नोंदवले आहेत.
आरोपीच्या कुटुंबाने जामिनासाठी आवश्यक कागदपत्रे तयार करण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी आरोपीचे कुटुंब ग्रेटर नोएडाच्या सूरजपूर येथील जिल्हा न्यायालयाच्या संकुलात पोहोचले आणि त्यांनी वकिलांना पेन ड्राइव्हमध्ये घटनेचे सीसीटीव्ही फुटेज दिले. घटनेच्या वेळी विपिन घराबाहेर होता. दूध आणल्यानंतर आरोपीची आई देखील दुकानात बसली होती असं आरोपीच्या कुटुंबाने सांगितले. आरोपीचे वडील सतवीर देखील घराबाहेर होते तर दीर सिरसा टोल प्लाझाजवळ कामावर होते. ते सिरसा टोल प्लाझाच्या एका अधिकाऱ्याची गाडी चालवतात. घटनेनंतर निक्की बेशुद्ध पडली. तिला निक्कीचा मोबाईल कुठे आहे हे माहित नाही असं निक्कीची बहीण कांचन हिने सांगितले.