बीड - मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता आणखी एक नवं वळण आलं आहे. या गुन्ह्यात वाल्मीक कराडसह ८ जणांवर दोषारोपपत्र दाखल असून अद्यापही कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे. आता हत्येतील आरोपी जयराम चाटे यांनी कबुली जबाबात सुग्रीव कराडचा उल्लेख करत वेगळाच दावा केला आहे. सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुख आणि इतरांनी खंडणी मागायला गेलेल्या सुदर्शन घुले आणि त्याच्या मित्रांना मारहाण केली होती. त्यातून झालेली बदनामी आणि खंडणीत आड येत असल्याने संतोष देशमुखची हत्या केली असं चाटे याने म्हटलं आहे.
संतोष देशमुख आपल्याला मारहाण करू शकत नाही या मारहाणीमागे सुग्रीव कराडचा हात असावा अशी शंका आरोपींना होती. त्यातूनच संतोष देशमुखच्या अपहरणाचा कट रचला. देशमुखांच्या अपहरणापूर्वी त्यांनी आपल्या व्हॉट्सअपला बाप तो बाप रहेगा असं कॅप्शन लिहून सुदर्शन घुले, प्रतीक घुले यांच्या मारहाणीचा स्टेटस ठेवला होता. त्याचा राग सुदर्शन घुले आणि गँगला होता. त्यातूनच सुदर्शन घुलेने अपमानाचा बदला म्हणून संतोष देशमुखचं अपहरण केले आणि त्याला मारहाण करत आपण सगळ्यांचे बाप आहोत हे दाखवून द्यायचे होते असं जबाबात म्हटलं आहे.
सुग्रीव कराडचा उल्लेख
संतोष देशमुख यांना मारहाण करताना त्यांच्या तोंडून सुग्रीव कराड आले होते. आवादा कंपनीच्या आवारात सुदर्शन घुले आणि इतरांना जी मारहाण झाली ती सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून झाली होती. बीच बाबत सुदर्शन घुलेला सहन झाली नाही. त्यामुळे बदला घेण्यासाठीच संतोष देशमुख यांना उचलून मारहाण करण्यात आली असा स्पष्ट उल्लेख जयराम चाटेने त्याच्या जबाबात केला आहे.
कोण आहे सुग्रीव कराड?
सुग्रीव कराड आणि वाल्मीक कराड हे रक्ताचे नातेवाईक नाहीत. सुग्रीव हा आधी धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता होता. परंतु लोकसभा निवडणुकीत त्याची भूमिका संशयास्पद राहिल्याने सुग्रीवला धनंजय मुंडे यांनी बाजूला केले. त्यानंतर तो बजरंग सोनावणेचे काम करत होता. २०२२ च्या केज नगरपंचायत निवडणुकीत सुग्रीव कराड उभा होता. त्याने विद्यमान खासदाराच्या मुलीचा पराभव केला होता. सुग्रीव अनेक वर्षापासून केजमध्ये राहायला आहे. तो राजकीय क्षेत्रातही कार्यरत आहे. त्याची आई पंचायत समिती सदस्या तर पत्नी नगरसेविका आहे. सुग्रीव कराडवर मारहाण, खून, दरोडा, दंगलीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
दरम्यान, कोण सुग्रीव कराड, त्याचा या प्रकरणात काहीही संबध नाही. हे प्रकरण आकाच्या सांगण्यावरूनच झाले हे कबुल केले आहे. इतक्या क्रूरपद्धतीने संतोष देशमुख यांना मारण्यात आले आहे. देशातच नव्हे जगात कुठेही अशी निघृण हत्या कुणी केली नसेल असं आमदार सुरेश धस यांनी म्हटलं.