नेपाळच्या जोडप्याचं बंगळुरूत कांड! सराफाच्या घरावर दरोडा घातला, २ किलो सोनं आणि रोकड घेऊन लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 10:03 IST2025-06-02T09:54:02+5:302025-06-02T10:03:20+5:30

घरात काम करणाऱ्या लोकांवर ठेवलेला आंधळा विश्वास कधी कधी अतिशय महागात पडू शकतो. अशीच एक घटना बंगळुरूतील एका सराफा सोबत घडली आहे.

Nepali couple did Robbery at a jeweler's house in Bangalore, 2 kg gold and cash stolen | नेपाळच्या जोडप्याचं बंगळुरूत कांड! सराफाच्या घरावर दरोडा घातला, २ किलो सोनं आणि रोकड घेऊन लंपास

नेपाळच्या जोडप्याचं बंगळुरूत कांड! सराफाच्या घरावर दरोडा घातला, २ किलो सोनं आणि रोकड घेऊन लंपास

घरात काम करणाऱ्या लोकांवर ठेवलेला आंधळा विश्वास कधी कधी अतिशय महागात पडू शकतो. अशीच एक घटना बंगळुरूतील एका सराफा सोबत घडली आहे. कर्नाटकच्या बंगळुरू जिल्ह्यातून चोरीचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका नेपाळी जोडप्याने आपल्या साथीदारांसोबत  मिळून सराफाच्या घरात चोरी केली. यात त्यांनी एक परवानाधारक बंदूक,  दोन किलो सोनं आणि १० लाखांची रोकड घेऊन घेऊन पळ काढला आहे. बंगळुरूच्या एचएएलजवळील लाल बहादुर शास्त्री नगरमध्ये राहणाऱ्या  ५५ वर्षीय व्यावसायिक रमेश बाबू यांच्या घरी ही चोरी झाली आहे. 

घरातील ऐवज लांपास करून पसार झालेले हे नेपाळी जोडपे रमेश बाबू यांच्या घरी काम करायचे. त्यांची नावे राज आणि दीपा अशी आहेत. राज आणि दीपा यांनी रमेश बाबूच्या घरी तीन महिन्यांपूर्वीच काम करायला सुरुवात केली होती. तीन महिन्यांतच या जोडप्याने रमेश बाबू आणि त्यांच्या कुटुंबाचा विश्वास संपादन केला होता. २७ मे रोजी रमेश त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह तिरुपतीला गेले. चोरीसाठी हा चांगला काळ आहे हे समजून, नेपाळी जोडप्याने आणि त्यांच्या साथीदारांसोबत मिळून घराचा मुख्य दरवाजा आणि बेडरूमचा दरवाजा तोडून चोरी केली.

शेजऱ्यांनी तपासताच उघड झाला गुन्हा! 
दरम्यान, २८ मे रोजी सकाळी रमेश यांनी आपल्या मोबाईल फोनवर घरातील सीसीटीव्ही तपासला. मात्र, त्यावेळेस तो सीसीटीव्ही बंद असल्याचे आढळले. त्यांना वाटले की वीज गेल्यामुळे सीसीटीव्ही काम करणे बंद झाले असेल, म्हणून त्यांनी शेजाऱ्यांना फोन करून तपासण्यास सांगितले. रमेश यांचे शेजारी घरी जाताच, तिथे चोरी झाल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी एचएएल पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तर, आरोपींचाही कसून शोध घेतला जात आहे. 

नियोजन करून घातला दरोडा!
ही चोरी नियोजन करून करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला आहे . नेपाळी जोडप्याव्यतिरिक्त, त्यांचे इतर तीन साथीदार देखील यात सहभागी होते. पोलीस उपायुक्त शिवकुमार गुणारे म्हणाले की, भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे आणि प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Web Title: Nepali couple did Robbery at a jeweler's house in Bangalore, 2 kg gold and cash stolen