UP Crime: उत्तर प्रदेशात रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या एका टीटीईनेच मानवतेला काळिमा फासणारे कृत्य केले आहे. गोरखपूरमध्ये एका एनसीसी कॅडेट तरुणीवर धावत्या ट्रेनमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिकीट देण्याच्या आणि सीट मिळवून देण्याच्या बहाण्याने या नराधम टीटीईने तरुणीला एसी कोचच्या केबिनमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
पीडित तरुणी गोरखपूरमध्ये भाड्याच्या खोलीत राहून सैन्य भरतीची तयारी करत आहे. ती एनसीसी सी सर्टिफिकेटची परीक्षा देण्यासाठी मऊ येथे गेली होती. परीक्षा देऊन परतताना स्टेशनवर प्रचंड गर्दी असल्याने तिला तिकीट काढता आले नाही. घाईघाईत ती अहमदाबाद-गोरखपूर एक्स्प्रेसच्या एसी कोचमध्ये चढली.
यावेळी ड्युटीवर असलेल्या राहुल कुमार नावाच्या टीटीईने तिला विनातिकीट प्रवास करताना पकडले. तरुणीने आपली अडचण सांगितल्यावर, तिला सीट मिळवून देतो असे सांगून तो तिला एसी फर्स्ट क्लासच्या केबिनमध्ये घेऊन गेला.
केबिनची कडी लावून अत्याचार
तरुणीचा आरोप आहे की, केबिनमध्ये नेल्यानंतर टीटीईने आतून दरवाजा बंद केला. सुरुवातीला त्याने सामान्य गप्पा मारल्या, पण काही वेळातच त्याची नियत बदलली. त्याने तरुणीवर धावत्या ट्रेनमध्ये बलात्कार केला. जेव्हा तिने प्रतिकार केला, तेव्हा तू विनातिकीट आहेस, तुझ्यावर मोठी कायदेशीर कारवाई करेन, अशी धमकी देऊन त्याने तिचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला.
आरोपी फरार, १० हजारांचे बक्षीस जाहीर
पीडितेने हिंमत दाखवत डायल ११२ वर फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. आपला गुन्हा उघड झाल्याचे लक्षात येताच, आरोपी टीटीई राहुल कुमार देवरिया स्टेशनवर ट्रेनमधून उतरून पळून गेला. राहुल कुमार हा रेल्वेच्या वाराणसी डिव्हिजनमध्ये तैनात आहे. रेल्वे पोलीस अधिक्षक लक्ष्मी निवास मिश्र यांनी सांगितले की, आरोपीला बडतर्फ करण्यासाठी विभागाला पत्र पाठवण्यात आले आहे. तसेच त्याला पकडण्यासाठी १०,००० रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
पोलिसांची भूमिका
गोरखपूर जीआरपी पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केला असून पीडित तरुणीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांची विशेष पथके तैनात करण्यात आली असून त्याचा शोध सुरू आहे.