Nanded Crime Election: राजकारणाची हाव माणसाला कोणत्या थराला नेऊ शकते, याचा एक सुन्न करणारा प्रकार नांदेड जिल्ह्यातून समोर आला आहे. ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीत सरपंच पदासाठी अपात्र ठरू नये, म्हणून एका नराधम पित्याने आपल्या सहा वर्षांच्या चिमुकलीची हत्या केली. महाराष्ट्र पंचायत राज कायद्यातील दोन अपत्यांच्या नियमात बसण्यासाठी या बापाने आपल्या एका मुलीला तेलंगणातील कालव्यात ढकलून देत तिचा काटा काढला.
नेमकं प्रकरण काय?
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील केरूर गावचा रहिवासी पांडुरंग कोंडमंगले (वय २८) हा गावात विराट सलून चालवतो. पांडुरंगला तीन मुले आहेत—एक तीन वर्षांचा मुलगा आणि सहा वर्षांच्या जुळ्या मुली. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत त्याला सरपंच व्हायचे होते. मात्र, महाराष्ट्रातील नियमानुसार दोनपेक्षा जास्त अपत्ये असणारी व्यक्ती निवडणूक लढवण्यास अपात्र ठरते. आपल्याकडे तीन मुले असल्याने आपण निवडणूक लढवू शकणार नाही, ही भीती त्याला सतावत होती.
सरपंचासोबत मिळून रचला कट
या समस्येतून मार्ग काढण्यासाठी पांडुरंगने गावाचा विद्यमान सरपंच गणेश शिंदे याची मदत घेतली. दोघांनी मिळून तिसऱ्या अपत्याला कमी करण्यासाठी अनेक मार्ग शोधले. सुरुवातीला एका मुलीला दत्तक देण्याचा किंवा दुसरीकडे सोडण्याचा विचार झाला. कागदोपत्री नाव कमी करण्यासाठी तो पुणे महापालिका कार्यालयातही जाऊन आला. मात्र, जन्म दाखल्यावर नोंद असल्याने कायदेशीररीत्या मुल कमी करणे अशक्य असल्याचे त्याच्या लक्षात आले. अखेर, पोटच्या मुलीची हत्या करून हा अपघात असल्याचा बनाव रचण्याचे या दोघांनी ठरवले.
तेलंगणात नेऊन मुलीला कालव्यात ढकलले
ठरल्याप्रमाणे, पांडुरंग आपल्या सहा वर्षांच्या प्राची या मुलीला दुचाकीवरून तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यात घेऊन गेला. तिथे निजामसागर कालव्यापाशी पोहोचल्यावर त्याने निर्दयीपणे प्राचीला वाहत्या पाण्यात ढकलून दिले. काही वेळातच आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांना काहीतरी पडल्याचा आवाज आला. त्यांनी धाव घेतली असता चिमुकलीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला.
असा झाला उलगडा
तेलंगणा पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन तिचे फोटो सोशल मीडिया आणि वर्तमानपत्रात प्रसिद्ध केले. हे फोटो पाहून महाराष्ट्रातील एका व्यक्तीने मुलीची ओळख पटवली आणि पोलिसांना माहिती दिली. तेलंगणा पोलीस तातडीने नांदेडमधील केरूर गावात पोहोचले. सुरुवातीला पांडुरंगने मुलीवर उपचार सुरू आहेत असे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला.
दोघांवरही गुन्हे दाखल
निजामाबाद पोलिसांनी पांडुरंग कोंडमंगले याला अटक केली असून, त्याला मदत करणारा सरपंच गणेश शिंदे यालाही सह-आरोपी करण्यात आले आहे. दोघांवरही हत्या आणि गुन्हेगारी कट रचल्याप्रनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेने संपूर्ण नांदेड जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे.
नेमका नियम काय आहे?
महाराष्ट्र विधीमंडळाने २००५ मध्ये 'महाराष्ट्र नागरी स्थानिक संस्था आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम' मध्ये सुधारणा केली. यानुसार ज्या व्यक्तीला १२ सप्टेंबर २००१ नंतर दोनपेक्षा जास्त मुले (तीन किंवा त्यापेक्षा जास्त) आहेत, ती व्यक्ती ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा नगरपालिकेची निवडणूक लढवण्यास अपात्र ठरते. स्वतःची मुले असताना एखादे मूल दुसऱ्याला दत्तक दिले, तरी कागदोपत्री त्या व्यक्तीच्या मुलांची संख्या कमी होत नाही. म्हणजेच, मूल दत्तक दिले तरी तो उमेदवार अपात्रच ठरतो.
Web Summary : Driven by political ambition, a Maharashtra man killed his six-year-old daughter in Telangana to circumvent a law disqualifying candidates with more than two children from contesting the upcoming Gram Panchayat election. He and the village Sarpanch are arrested.
Web Summary : राजनीतिक महत्वाकांक्षा से प्रेरित होकर, महाराष्ट्र के एक व्यक्ति ने तेलंगाना में अपनी छह साल की बेटी की हत्या कर दी ताकि दो से अधिक बच्चों वाले उम्मीदवारों को अयोग्य ठहराने वाले कानून से बचा जा सके। ग्राम पंचायत चुनाव से पहले यह घिनौना कृत्य किया गया। पिता और सरपंच गिरफ्तार।